महात्मा गांधींना शिविगाळ, नथुराम गोडसेचे आभार.. अकोल्याच्या कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई तक

• 06:42 AM • 27 Dec 2021

रायपूर: देशातील विविध राज्यांमध्ये हिंदू ‘धर्म संसदेचे’ आयोजन करण्यात येत असून त्यात सहभागी होणारे साधू-संत त्यांच्या काही विधानांनी नव्या वादाला तोंड फोडत आहेत. रविवारी एका धर्म संसदेत बोलताना अकोल्याच्या कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचं कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे तर धर्माच्या रक्षणासाठी लोकांनी कट्टर हिंदू नेत्याला सरकारचे प्रमुख म्हणून निवडले पाहिजे. असंही […]

Mumbaitak
follow google news

रायपूर: देशातील विविध राज्यांमध्ये हिंदू ‘धर्म संसदेचे’ आयोजन करण्यात येत असून त्यात सहभागी होणारे साधू-संत त्यांच्या काही विधानांनी नव्या वादाला तोंड फोडत आहेत. रविवारी एका धर्म संसदेत बोलताना अकोल्याच्या कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचं कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे तर धर्माच्या रक्षणासाठी लोकांनी कट्टर हिंदू नेत्याला सरकारचे प्रमुख म्हणून निवडले पाहिजे. असंही त्यांनी या सभेत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्म संसदेत भाषण देताना कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला. ज्यावर काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले कालिचरण महाराज

महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत हीन दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालिचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे.

कालिचरण महाराज हे फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं आहे.

कालिचरण महाराज यांनी भर सभेत जे काही तारे तोडले आहेत त्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कठोर शब्दात यावर टीका केली आहे. ‘हा भगवा पांघरलेला घोटाळेबाज राष्ट्रपिता महात्मा गांधींना उघडपणे शिवीगाळ करत आहे. याला तात्काळ अटक केली पाहिजे. गांधीजींशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा अक्षम्य गुन्हा आहे.’

महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी देखील यावर टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदीजी तुम्ही कसला देश बनवला आहे? जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खुल्या मंचावरून शिव्या दिल्या जात आहेत आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल.’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक म्हणाले, ‘सत्य, अहिंसेला खोटं आणि हिंसक कधीही पराभूत करु शकत नाही. बापू आम्हाला लाज वाटते, तुमचे मारेकरी जिवंत आहेत.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रायपूरमधील आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी बोलताना कालीचरण म्हणाले, “इस्लामचे ध्येय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्र काबीज करणे आहे. आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी 1947 मध्ये कब्जा केला… . त्यांनी यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तानवर कब्जा केला होता.. मी मोहनदास करमचंद गांधींची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो.’

महंत रामसुंदर दास यांनी सोडला मंच

कालीचरण यांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसचे माजी आमदार आणि छत्तीसगड गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास म्हणाले की, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपिताविरुद्ध असे अपमानास्पद शब्द वापरले जाऊ नयेत.’

दास म्हणाले, ‘ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो मार्ग हरवला आहे. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महात्मा गांधींना देशद्रोही ठरवले जात आहे. मला आयोजकांना विचारायचे होते की त्यांनी असा आक्षेप का घेतला नाही? मला माफ करा, पण मी या कार्यक्रमातून स्वत: माघार घेत आहे.’ त्यानंतर दास स्टेजवरून निघून गेले.

कालिचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, कालिचरण यांच्यावर महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्येच, टिकरापारा भागात गुन्हा क्रमांक 578/2021 धारा 505(2), 294 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरचे माजी महापौर आणि विद्यमान सभापती प्रमोद दुबे यांनी कालिचरण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

    follow whatsapp