कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मुंबई तक

• 01:50 AM • 17 Jan 2022

देशातील सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. रविवारी रात्री उशिरा हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. बिरजू महाराजांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 4 फेब्रुवारी 1938 रोजी पं. बिरजू महाराज यांचा जन्म झाला. पं. बिरजू महाराज […]

Mumbaitak
follow google news

देशातील सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. रविवारी रात्री उशिरा हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. बिरजू महाराजांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

4 फेब्रुवारी 1938 रोजी पं. बिरजू महाराज यांचा जन्म झाला. पं. बिरजू महाराज यांचे वडील म्हणजे लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील अच्छन महाराज. ब्रिजमोहन मिश्रा हे बिरजू महाराजांचे खरे नाव. बिरजू हे त्यांचे लहानपणचे नाव. आता त्यांना पंडित बिरजू महाराज अशीच ओळख लाभली आहे.

पं. बिरजू महाराज यांना नृत्य वारसा हक्कानेच मिळाले होते. त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती. बालपणातच त्यांनी आपल्या वडिलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली; मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही. पं. बिरजू महाराज यांच्या वयाच्या दहाव्या वर्षीच अच्छन महाराजांचे निधन झाले. पुढचे शिक्षण बिरजू महाराज यांनी त्यांचे काका पंडित लच्छू महाराज आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडे घेतले. लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले, तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा. बिरजू महाराज यांनी हे सगळे टिपकागदाप्रमाणे आत्मसात केले. थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते. ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून बिरजू महाराज यांनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले.

बिरजू महाराज यांचे बालपण अतिशय हलाखीत गेले. त्यांचे काका लच्छू महाराज मुंबईत नृत्य गुरू म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या या पुतण्याला मुंबईला येण्याचा प्रस्ताव दिला. खूप मोठी संधी बिरजू महाराज यांच्याकडे चालून आली होती; पण त्यांच्या आईने त्यांना अडवले. ‘चित्रपटसृष्टीत नाव, प्रसिद्धी, पैसा सगळे मिळेल; पण घराण्याचे काम अर्धवट राहील. घराण्याचा वारसा पुढे नेणे हे तुझे प्रथम कर्तव्य आहे!’ असे सांगून आईंनी महाराजजींना जणू त्यांच्या जीवितकार्याची जाणीव करून दिली. बिरजू महाराज यांनीही आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानली. पुढे काही तुरळक सिनेमांचा अपवाद वगळता महाराजजी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले.

लहान वयात बिरजू महाराज यांची उत्तम नर्तक म्हणून ख्याती होतीच; पण या वयातच उत्तम गुरू म्हणूनही त्यांचा लौकिक होऊ लागला. त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली. ‘फाग-लीला’, ‘मालती-माधव’, ‘कुमार संभव’ ही त्यातील काही नावे. या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या. त्यांनी ‘रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले. संपूर्ण देशभरात आणि विदेशात बिरजू महाराज यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

बिरजू महाराज यांचे नृत्य पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच! मोराच्या गतीत जेव्हा बिरजू महाराज मोराची चाल करतात तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटते. त्यांचे भावांगही तितकेच सहज सुंदर. एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर विविध रंगछटा लीलया साकाराव्यात त्याच सहजतेने त्यांच्या चेहेऱ्यावर भाव जिवंत होतात. सौंदर्यरसाच्या या उधळणीत रसिकमन चिंब भिजून जाते.

    follow whatsapp