Ravindra Waikar : ठाकरेंकडून आलेल्या नेत्याला शिंदेंनी दिले तिकीट, 'या' मतदारसंघातून लढणार

ऋत्विक भालेकर

30 Apr 2024 (अपडेटेड: 30 Apr 2024, 11:43 AM)

Ravindra waikar mumbai north west lok sabha

रवींद्र वायकर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे.

रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

follow google news

Ravindra Waikar Mumbai North West Lok Sabha : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आलेल्या रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत रवींद्र वायकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असणार असून, ते मुंबई उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. (Eknath Shinde's Shiv Sena Nominate Ravindra Waikar From Mumbai North west Lok Sabha)

हे वाचलं का?

एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी अलिकडेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतली. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. 

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून दोन नावांची चर्चा होती, यात वायकर यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडी होते. संजय निरुपम यांच्या नावाचीही चर्चा होती, पण त्यांना अमराठी चेहरा असल्याने विरोध होता, अशी माहिती आहे. अखेर रवींद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

भूखंड प्रकरणामुळे आले होते अडचणीत

खरंतर रवींद्र वायकर हे ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत जातील याची चर्चा त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर सुरू झाली होती. जोगेश्वरी येथील क्लबच्या जागेचा गैरवापर करून तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झालेला होता. 

पण, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रकरणात मुंबई महापालिकेने त्यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 

 

अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर

या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता. कीर्तिकर यांना तब्बल 60 टक्के मते मिळाली होती. यावेळी ठाकरेंनी मुलगा अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने गजानन कीर्तिकरांनी माघार घेतली आहे. 

आता गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कीर्तिकर विरुद्ध वायकर अशी लढत या मतदारसंघात बघायला मिळणार आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांपैकी तीन भाजपचे आमदार (गोरेगाव-विद्या ठाकूर, वर्सोवा- भारती लव्हेकर, अंधेरी पश्चिम - अमित साटम) आहेत. तर दोन आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, तर दिंडोशीमधून सुनील प्रभू हे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगदार होणार असे दिसत आहे. 

वायकरांच्या नावाला शालिनी ठाकरेंचा विरोध

मनसेच्या सरचिटणीस यांनी रवींद्र वायकर यांचे नाव चर्चेत असतानाच त्यांच्या नावाला विरोध केला होता. उमेदवार नसल्यावरून त्यांनी शिंदेंना चिमटा काढला होता. "मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे", असे त्या म्हणालेल्या.

 

"लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये", असे सांगत त्यांनी वायकरांच्या नावाला विरोध केला. पण, ही पदाधिकाऱ्याची भूमिका आहे. पक्षाची नाही, अशी भूमिका मनसे स्पष्ट केली आहे. 

    follow whatsapp