Crime News : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये लग्नाच्या तीन महिन्यांनंतर 28 वर्षीय नवविवाहिता मुस्कान सिमोलिया हिचा हॉटेलच्या खोलीत मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी पतीवर हत्येचा आरोप केला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुस्कान रेल्वेतील कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी माहेरी राहत होती. तिचे लग्न 29 जून 2026 रोजी मध्य प्रदेशातील विदिशा येथील निलेश याच्याशी झाले होते. निलेश हा बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतो.
ADVERTISEMENT
नविवाहितेची फसवणूक झाल्याचा आरोप, पतीने केले दोन लग्न?
लग्नानंतर मुस्कानला तिचा पती आधीच विवाहित असल्याचे समजल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याची पहिली पत्नी इंदूर येथे राहत असल्याचेही मुस्कानचे वडील रामजी लाल अहिरवार यांनी सांगितले. या मुद्द्यावरून निलेश मुस्कानला वारंवार टोमणे मारत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्कान 10 ऑक्टोबरपासून रेल्वेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेच्या तयारीसाठी माहेरी राहत होती. ही परीक्षा 28 ऑक्टोबर रोजी होणार होती. दरम्यान, 23 ऑक्टोबर रोजी निलेश तिच्या माहेरी आला. मावशीच्या घरी घेऊन जात असल्याचे सांगून त्याने मुस्कानला सोबत नेले. मात्र, हे दोघे झाशी येथील ऋषभ हॉटेलमध्ये गेले. तेथील खोली क्रमांक 212 मध्ये त्यांनी मुक्काम केला.
हेही वाचा : विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : पोस्टल मतांमध्ये प्रतापसिंह पाटील आघाडीवर
दुसऱ्या दिवशी सकाळी मुस्कानच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली. तिच्या वडिलांनी निलेशवर मारहाण केल्याचा आणि मुस्कानचे डोके भिंतीवर आपटल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मुस्कानचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. झाशीच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रीती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेशने चौकशीदरम्यान वेगळी माहिती दिली आहे. 24 ऑक्टोबर रोजी हॉटेलमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू असताना मुस्कान अचानक खोलीत पडली, असे निलेशने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याने मुस्कानला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी हॉटेलची पाहणी केली असून, तेथील सीसीटीव्ही चित्रणाचीही तपासणी केली आहे. या चित्रणात मुस्कान खोलीत पडताना दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून, तपासातील निष्कर्ष आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












