मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर दोनदा राजीनामा देणार होते पण पवारांनी थांबवलं

मुंबई तक

• 01:14 PM • 27 Jun 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ आणि २२ जून या दोन दिवशी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र मविआचे ज्येष्ठ नेते शऱद पवार यांनी त्यांना थांबवलं म्हणून त्यांनी राजीनामा दिला नाही अशी सूत्रांची माहिती आहे. ऱाज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जी अभूतपूर्व उलथापालथ झाली त्यानंतर उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार होते. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ते ही […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ आणि २२ जून या दोन दिवशी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र मविआचे ज्येष्ठ नेते शऱद पवार यांनी त्यांना थांबवलं म्हणून त्यांनी राजीनामा दिला नाही अशी सूत्रांची माहिती आहे. ऱाज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जी अभूतपूर्व उलथापालथ झाली त्यानंतर उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार होते. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ते ही घोषणा करणार होते मात्र त्यांना शरद पवार यांनी अडवल्याचं समजतं आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचा ‘रात्रीस राजकीय खेळ’?; पहाटे २ ते ४ दरम्यान गुजरातला काय घडलं?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे २० तारखेच्या रात्री ३० हून अधिक आमदारांना घेऊन सुरतला गेले. त्यानंतर ते गुवाहाटीला पोहचले. २१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे फेसबुकद्वारे भूमिका मांडतील हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलं होतं. आता त्याच फेसबुक लाइव्हच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते ही माहिती समोर येते आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Eknath Shinde: उद्धव ठाकरे सरकार वाचवू शकतील का? महाराष्ट्र विधानसभेचं गणित प्रचंड रंजक

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष हा आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. ही लढाई आता ११ जुलैपर्यंत लांबली आहे कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचं बंडखोर आमदारांचं निलंबन ११ जुलैच्या सुनावणीपर्यंत करू नये असं कोर्टाने म्हटलं आहे. बंडखोर आमदारांपैकी १६ जणांवर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई शिवसेनेने केली होती. त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी २७ जूनच्या संध्याकाळी ५.३० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र रविवारी बंडखोरांचा गट या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत उत्तर देण्याची मुदत वाढवून दिली आहे आणि तोपर्यंत सदस्यत्व रद्द कऱण्याची कारवाई करू नये असं म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत…” शरद पवारांनी स्पष्ट केली महाविकास आघाडीची भूमिका

या सगळ्या घडामोडी समोर येत असताना आणि महाराष्ट्राचं राजकारण क्षणोक्षणी बदलत असताना ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्याकडे संख्याबळ नाही असं म्हटलं आहे. तर बंडखोर आमदारांनी जी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे त्यातही आम्ही या सरकारचा पाठिंबा काढला आहे हे नमूद केलं आहे. ३८ आमदारांनी पाठिंबा काढल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

आता महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाणार हे निश्चितपणे पूर्णपणे सांगता येत नसलं तरीही ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार होते असं आता समोर आलं आहे. २१ जून म्हणजेच ज्या दिवशी बंड घडलं त्यादिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जूनला अशा दोन्ही दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते मात्र शरद पवारांनी त्यांना सांगितल्याने त्यांनी विचार बदलला अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे.

    follow whatsapp