Maratha Reservation : ..अन्यथा आम्हाला आमचा लढा पुन्हा सुरू करावा लागेल-संभाजीराजे

मुंबई तक

• 05:50 AM • 15 Jul 2021

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहेच. या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरीही महिनाभरात प्रशासनाने काहीही कारवाई सरकारकडून झालेली नाही. असं पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोघांनाही उद्देशून लिहिलं आहे. तसंच निर्णयाची अमलबजावणी झाली […]

Mumbaitak
follow google news

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहेच. या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरीही महिनाभरात प्रशासनाने काहीही कारवाई सरकारकडून झालेली नाही. असं पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोघांनाही उद्देशून लिहिलं आहे. तसंच निर्णयाची अमलबजावणी झाली नाही तर आम्हाला आमचा लढा पुन्हा सुरू करावा लागेल असाही इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे संभाजीराजेंनी पत्रात?

सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या. आरक्षणाइतक्याच या मागण्या महत्त्वपूर्ण असून या मागण्यांच्या पूर्ततेनंतर मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभारच लागणार आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजास वेठीस न धरता थेट लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मूक आंदोलनाचा पर्याय निवडला. 16 जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर राज्य शासनाने आम्हाला मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीस निमंत्रित केले. 17 जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण, राज्याचे महाधिवक्ता यांचेसह राज्यातील प्रमुख समन्वयक व संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मंत्रिगणांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असता, उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करणेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कालावधी मागितला होता. याबाबत राज्य शासनाचे वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करणेसाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे मा. अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण यांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून, संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आधी समाज बोलला. लोकही बोललेत. समाजानं आपल्या हक्कांसाठी आंदोलनं अन् महामोर्चेही काढलेत. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं हाती घ्यावा. त्यासाठी आता सरकारवर दबावासाठी समाजानं लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार-आमदारांना जाब विचारावा. अन् आता समाजाला या लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यावं, असं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp