गणेशभक्तांना लालबाग-परळमध्ये ‘नो एण्ट्री’ : बाप्पाचं दर्शन ऑनलाईनच घ्यावं लागणार

मुंबई तक

• 03:29 AM • 07 Sep 2021

कोरोनाची भीती आणि तिसऱ्या लाटेचं सावट अशा परिस्थिती यंदाचा गणेशोत्सव होत असून, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी लालबागसह गणेशोत्सवामुळे गर्दी होणाऱ्या परिसरासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लालबाग आणि परळमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी होते. यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन न घेता फक्त ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाची भीती आणि तिसऱ्या लाटेचं सावट अशा परिस्थिती यंदाचा गणेशोत्सव होत असून, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी लालबागसह गणेशोत्सवामुळे गर्दी होणाऱ्या परिसरासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

मुंबईतील लालबाग आणि परळमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी होते. यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन न घेता फक्त ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट आदेशच मुंबई पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात लालबाग परळमध्ये राज्यातून येणाऱ्या गणेशभक्तांना ‘नो एण्ट्री’ असणार आहे.

कोकणासह मुंबईतही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेषतः मुंबईतील लालबाग, परळ आणि काळाचौकी या ठिकाणी दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. येथील अनेक गणेश मंडळाच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी राज्यासह विविध ठिकाणाहून गणेशभक्त दर्शनाला येतात.

लालबागचा राजा, गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकीचा महागणपती, तेजुकायचा राजा, नरेपार्कचा राजा यासारख्या अनेक मंडळांचा यामध्ये समावेश असतो.

मुखदर्शन असो किंवा प्रत्यक्ष नवसाच्या रांगेतून दिवसाला दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या लाखांवर असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा याठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.

विशेषतः लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं गर्दी होते. यंदाही गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांकडून येथील तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. आढावा घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी याठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी या संपूर्ण विभागातील गणेशोत्सव मंडळासाठी फक्त ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्याची सूचना दिली दिली आहे.

यासाठी मंडळांनी युट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करण्याची सूचना मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्सव कालावधीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचनाही देण्यात आलेली आहे.

    follow whatsapp