Lok Sabha Election 2024: 'अंबानी-अदाणी टेम्पोतून पैसे देतात हा काय तुमचा...', राहुल गांधींचा मोदींना बोचरा सवाल!

मुंबई तक

08 May 2024 (अपडेटेड: 08 May 2024, 09:48 PM)

Rahul Gandhi vs PM Modi: अंबानी आणि अदाणी यांच्याकडून काँग्रेस किती पैसा घेत आहे? असा सवाल करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. जाणून घ्या राहुल गांधी नेमकं काय म्हणाले.

राहुल गांधींचा मोदींना बोचरा सवाल!

राहुल गांधींचा मोदींना बोचरा सवाल!

follow google news

Rahul Gandhi on Ambani-Adani: मुंबई: 'राहुल गांधींनी निवडणूक जाहीर होताच अदाणी-अंबानी यांचं नाव घेणं का बंद केलं? तुम्ही काळा पैसा किती पोती गमावला? टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्या आहेत का?' असं भुवया उंचावणारं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 मे) तेलंगणातील जाहीर सभेत केलं. ज्याला आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तशाच स्वरुपाचं उत्तर दिलं आहे. (lok sabha election 2024 is it your personal experience that ambani adani sending money through tempo rahul gandhi asked pm modi a direct question)

हे वाचलं का?

जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा अदाणी आणि अंबानी यांचा उल्लेख केला. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडून किती पैसा राहुल गांधींना आला? असा सवालही त्यांनी विचारला. ज्याला राहुल गांधींनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून तात्काळ उत्तर दिलं आहे.

'अंबानी-अदाणी टेम्पोतून पैसे देतात. हा काय तुमचा स्वत:चा अनुभव आहे का?' असा बोचरा सवाल विचारत राहुल गांधींनी या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी पुढे असंही म्हणाले की, 'सीबीआय-ईडीला यांच्याकडे पाठवा ना.. अजिबात घाबरू नका मोदीजी.'

पाहा राहुल गांधी नेमकं काय म्हणाले.. 

'नमस्कार मोदीजी आपण घाबरलात का? सहसा तुम्ही बंद दाराआड तुम्ही अंबानी-अदाणींबाबत बोलता.. पहिल्यांदा तुम्ही जाहीररित्या अंबानी-अदाणी बोलले..' 

'तुम्हाला हे देखील माहिती आहे की, ते टेम्पोतून पैसे देतात. हा काय तुमचा स्वत:चा अनुभव आहे का? एक काम करा.. सीबीआय-ईडीला यांच्याकडे पाठवा ना.. संपूर्ण चौकशी करा. लवकरात लवकर चौकशी करा.. अजिबात घाबरू नका मोदीजी.' 

'मी देशाला पुन्हा एकदा सांगतोय जेवढा पैसा नरेंद्र मोदीजींनी यांना दिलाय ना तेवढाच पैसा आम्ही हिंदुस्थानातील गरीब लोकांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना, या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना लखपती बनवू आम्ही.. यांनी 22 जणांना अब्जाधीश बनवलं आहे. आम्ही मात्र, कोट्यवधी जणांना लखपती बनवू.' असं राहुल गांधी म्हणाले.

 

पंतप्रधान मोदींनी अंबानी-अदाणींचं नाव घेत काय केलेली टीका?

पीएम मोदी म्हणाले, 'तुम्ही पाहिलं असेल की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्याबरोबर जपमाळ जपायला सुरुवात करत होते. जेव्हापासून त्यांचे राफेल प्रकरण थंड झालं तेव्हापासून त्यांनी नवीन जपमाळ सुरू केली. ते पाच वर्षे एकच जपमाळ जपायचे. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती.. मग हळूच म्हणू लागले. अंबानी-अदाणी... मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदाणींना शिव्या देणं बंद केलं.'

पंतप्रधानांनी काँग्रेसला सवाल विचारताना म्हणाले की, 'राजकुमाराने घोषित करावे की, या निवडणुकीत अंबानी-अदाणी यांच्याकडून किती 'माल' उचलला आहे. काळा पैशाच्या किती पोती आणल्या आहेत? टेम्पो भरून नोटा काँग्रेससाठी पोहोचल्या आहेत का? काय डील झालं आहे? तुम्ही एका रात्रीत अंबानी-अदाणींना शिव्या देणे बंद केले. जरूर दाल मै कुछ काला है... पाच वर्षे तुम्ही अंबानी-अदाणींना शिव्या दिल्या. पण एका रात्रीत शिव्या देणं बंद झालं. म्हणजे कोणता ना कोणता चोरीला माल हा टेम्पो भरभरून तुम्हाला मिळाला आहे.   याचं उत्तर तुम्हाला देशाला द्यावं लागेल.' अशी टीका मोदींनी केली आहे. 

आतापर्यंत राहुल गांधी हे सातत्याने अंबानी आणि अदाणी या उद्योजकांवर टीका करत आले आहेत. पण याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी राहुल गांधीना सवाल उपस्थित केले. ज्याला आता राहुल गांधींनीही उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून देशाचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

    follow whatsapp