Gadchiroli Crime, व्येंकटेश दुडमवार : गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फर्निचरच्या कामाचा वाद सोमवारी दुपारी इतक्या टोकाला गेला की यात एका तरुणाचा जागीच बळी गेला. गडचिरोली शहरातील लांझेडा वॉर्डात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने आधी तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि त्यानंतर फर्निचर बनविण्याच्या धारदार शस्त्राने (वाकस) छातीवर सपासप वार करून त्याची हत्या केली. सचिन रामचंद्र कोलूरवार (35, रा. विवेकानंद नगर) असे मृतकाचे नाव असून, या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महेश महादेव बुरांडे (34, रा. लांझेडा वॉर्ड) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Personal Finance: तुम्हाला दर महिन्याला मिळतील 60 हजार रुपये, 'हा' गोल्डन फॉर्म्युला विसरू नका!
5 वर्षांपासून फर्निचर दिले नाही
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने कोरोना काळात गडचिरोलीत असताना आरोपी महेश बुरांडे याला सागवानी फर्निचर बनवण्यासाठी 2 लाख रुपये दिले होते. मात्र, 5 वर्षे उलटूनही महेशने फर्निचर दिले नव्हते. या व्यवहारात मध्यस्थी करण्यासाठी सचिन कोलूरवार व त्याचा मित्र सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महेशच्या घरी गेले होते.
फर्निचर अद्याप तयार नसल्याचे पाहून सचिन आणि महेश यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. संतापलेल्या महेशने अचानक घरातील मिरचीचे तिखट सचिनच्या डोळ्यांत फेकले. डोळ्यांची जळजळ झाल्याने सचिन असहाय्य होताच, महेशने फर्निचर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या 'वाकसा'ने सचिनच्या छातीवर खोलवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सचिनचा काही क्षणातच मृत्यू झाला.
नातेवाईकांचा आक्रोश
मृतक सचिन कोलूरवार हा चामोर्शी मार्गावर पानठेला चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. 6 वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याची साडेतीन वर्षांची चिमुकली मुलगी आता पितृप्रेमाला पारखी झाली आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.
हे ही वाचा : महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ?, 'त्या' एका गोष्टीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत?
आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आरोपी महेश बुरांडे हा घटनेनंतर फरार झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
ADVERTISEMENT











