Badlapur Crime : बदलापूर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचा खून करून तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचणाऱ्या पतीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात महिलेचा मृत्यू नाक-तोंड दाबून श्वास गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक खुलाशानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी कारवाई करत आरोपी पती आणि त्याच्या आईला (सासू) अटक केली आहे.
ADVERTISEMENT
घटस्फोटास स्पष्ट नकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव प्राजक्ता मेहर असे असून 2010 मध्ये त्यांचा विवाह बदलापूरच्या एरंजाड गावातील योगेश मेहर याच्याशी झाला होता. या दाम्पत्याला 15 आणि 11 वर्षांची दोन मुले आहेत. योगेशचे गावातील पूजा मेहर नावाच्या महिलेसोबत कथित प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधांमुळे योगेश आपल्या पत्नीवर म्हणजेच प्राजक्तावर सातत्याने घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. मात्र, प्राजक्ताने घटस्फोट देण्यास स्पष्ट नकार दिला होता. या नकाराचा राग मनात धरूनच प्राजक्ताची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक आरोप पोलिसांनी केला आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना अचानक भेटले CM फडणवीस.. सोबत संजय राऊतही, एकाच विमानातून प्रवास, चर्चा अन्...
हवे तेवढे पैसे घ्या अन्...
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, 14 मार्च 2026 रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावून 'हवे तेवढे पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा' अशी पैशांची ऑफर दिली होती. मात्र माहेरच्या लोकांनी याला स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे पती-पत्नीतील वाद अधिकच पेटला. पुढे 8 एप्रिल रोजी दोघांमध्ये वाद झाला आणि 9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती तिच्या माहेरच्यांना दिली. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि संशयास्पद वाटल्याने मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून व्हिसेरा जतन करण्यात आला होता.
हे ही वाचा : नवरा बाहेर असताना 'तो' महिलेसोबत फ्लॅटमध्ये.., शेवटी सूरजने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी
प्रेयसीच्या भूमिकेची चौकशी
अखेर 23 जून रोजी प्राप्त झालेल्या पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक अहवालात प्राजक्ताचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची नाक-तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचे वैद्यकीय पुरावे समोर आले. या अंतिम अहवालाच्या आधारे बदलापूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी पती योगेश मेहर आणि त्याची आई अरुणा मेहर यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, मृत प्राजक्ताच्या नातेवाईकांनी योगेशच्या प्रेयसीच्या आणि इतर काही जणांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस सध्या या गुन्ह्याचे ठोस पुरावे गोळा करत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
ADVERTISEMENT











