उद्धव ठाकरेंना अचानक भेटले CM फडणवीस.. सोबत संजय राऊतही, एकाच विमानातून प्रवास, चर्चा अन्...
मुंबईवरून नागपूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाचा विमानाने प्रवास केल्याचं समोर आलं आहे. या विमान प्रवासात दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचं देखील समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई ते नागपूर या विमान प्रवासादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच विमानाने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांची विमानात भेट झाली. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, काही वेळ संवाद साधला आणि एकमेकांची विचारपूसही केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आणि खासदार अनिल देसाई (Anil Desai)हे देखील विमानात उपस्थित होते. विशेष म्हणजे, संजय राऊत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातही काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात विदर्भातून
शिवसेना (UBT) मधून सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवसांचा विदर्भ दौरा करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात यवतमाळमधून होणार असून, नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर ते थेट यवतमाळकडे रवाना होणार आहेत. फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना धीर देणे, पक्षाची भूमिका मांडणे आणि नव्याने संघटनबांधणी करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश मानला जात आहे.
हे ही वाचा>> ठाकरेंचा सहावा खासदार फडणवीसांनी शिंदेंकडे कसा पाठवला? एक शब्द, अन्यथा...
फडणवीसांचाही नागपूर दौरा
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा दौरा पूर्ण करून मुंबईतून नागपूरकडे प्रस्थान केले. नागपूरमध्ये त्यांचे पुढील दोन दिवस विविध शासकीय आणि राजकीय कार्यक्रम निश्चित आहेत. त्यामुळे योगायोगाने दोन्ही नेते एकाच विमानाने प्रवास करत असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले.









