राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही; मग तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मटका किंगला एन्ट्री कशी?

मुंबई तक

15 Oct 2026 (अपडेटेड: 15 Oct 2026, 12:01 PM)

Tulja Bhavani temple : राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्र्यांनाही देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही; मग तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मटका किंगला एन्ट्री कशी? तुळजापुरात खळबळ! आमदार राणा पाटलांच्या खासगी सचिवांसह मुख्य महंत वाकोजी बुवा आणि नगराध्यक्ष पिटू गंगणे या तिघांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

Tulja Bhavani temple :

Tulja Bhavani temple :

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही;

point

मग तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मटका किंगला एन्ट्री कशी?

Tuljabhavani Temple, गणेश जाधव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले जात असताना, सोलापूरच्या मटका किंगला थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तुळजापूरच्या मंदिरातील नियम आणि दर्शनव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सामान्य भाविकांना दर्शनासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागते. मात्र अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे याला गाभाऱ्यात प्रवेश कसा मिळाला? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी श्री तुळजाभवानी भोपी-पुजारी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्र्यांनाही प्रवेश नाही; मग मटका किंगला विशेष सुविधा?

तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशाबाबत कडक नियम असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तींनाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही, असं म्हटलं जातं. मात्र, अशा परिस्थितीत सोलापूर येथील मटका किंग अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे याला थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याने मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा : उल्हासनगर : RTI कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 4 वर्षांपूर्वीचं वैर..नेमकं काय घडलं?

मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच प्रतिबंधित परिसरात देवीचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देऊळ कवायत कलम 24 आणि 25 अन्वये कारवाई केली जाईल, अशी नोटीस मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी जारी केली होती. मात्र, याच परिसरात दादा रोडगे याला प्रवेश देण्यात आल्याचा आणि फोटोसेशन झाल्याचा प्रकार समोर आल्याने नियमांच्या अंमलबजावणीबाबत सवाल उपस्थित होत आहेत.

आमदारांच्या खासगी सचिवांसह तिघांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

या प्रकरणी श्री तुळजाभवानी भोपी-पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉ. कीर्ती किरण पुजार आणि पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात महंत वाकोजी बुवा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खासगी सचिव सुधीर जमदाडे आणि नगराध्यक्ष विनोद पिंटू गंगणे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दादा रोडगे यांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याची परवानगी कोणी दिली आणि कोणत्या अधिकाराखाली प्रवेश देण्यात आला? याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मंडळाने केली आहे.

निवेदनात रोडगे यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई आणि तडीपारीसंदर्भातील नोंदी असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी मंडळाने केली आहे.

राणा पाटील यांची फेसबुक पोस्ट; म्हणाले, दोषींवर निश्चित कारवाई होणार

या प्रकरणावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील पीकविम्यासंदर्भातील सुनावणीच्या अनुषंगाने आपण काल सकाळपासून नवी दिल्लीत असल्याचे त्यांनी सांगितले. “श्री तुळजाभवानी मंदिरात काल गाभाऱ्यात जो प्रकार घडला आहे, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत आपण जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना सूचना दिल्या आहेत. जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल,” असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.