नितीन गडकरी चुकीच्या पक्षातला चांगला माणूस – अशोक चव्हाण

मुंबई तक

• 03:45 AM • 31 May 2021

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारची गेल्या सात वर्षांमधली कामगिरी फारशी उल्लेखनीय नसली तरीही रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं काम हे चांगलं झालं आहे. नितीन गडकरींचा उल्लेख चुकीच्या पक्षातला चांगला माणूस असं करावं लागेल असं मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराबद्दल बोलण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत […]

Mumbaitak
follow google news

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारची गेल्या सात वर्षांमधली कामगिरी फारशी उल्लेखनीय नसली तरीही रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं काम हे चांगलं झालं आहे. नितीन गडकरींचा उल्लेख चुकीच्या पक्षातला चांगला माणूस असं करावं लागेल असं मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराबद्दल बोलण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातल्या महत्वाच्या आणि छोट्यातल्या छोट्या कामांबद्दल गडकरी नेहमी चांगलं काम करतात. मी ट्विटरवरुन किंवा लेखात त्यांच्या कामाचं कौतुक नेहमीच करतो. पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या राजकीय भूमिकेचं समर्थन करतो. ते एका चुकीच्या पक्षातले चांगले माणूस आहेत असं म्हणत अशोक चव्हाणांनी गडकरींचं कौतुक करत नरेंद्र मोदींना चिमटा काढला. रस्ते आणि वाहतूक क्षेत्रातलं गडकरींचं काम कौतुकास्पद असून केंद्रात त्यांचे अधिकार काढून घेत कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो असंही चव्हाण म्हणाले.

यावेळी बोलत असताना अशोक चव्हाणांनी नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कालखंडावर जोरदार टीका केली. नोटबंदी, जीएसटी, कोरोनाची लाट हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचं अशोच चव्हाण म्हणाले. लसीकरणाबाबतही केंद्र सरकार राज्यासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला.

राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी आता घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला कायदा जर परिपूर्ण होता तर तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही, असा प्रश्न करत चव्हाण यांनी विचारला. आता हा प्रश्न सोडविण्यासाठी मैदानात उतरलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा उद्देश सर्वाशी चर्चा करून निर्णय घेण्याचा असल्याने प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचे निष्कर्ष नव्या समीकरणापर्यंत जातील असा निकर्ष काढणे चुकीचे ठरेल असंही चव्हाण म्हणाले. विनायक मेटेकडून केली जाणारी टीका स्वत:च्या विधान परिषदेतील जागा राखण्यासाठी आणि भाजप नेत्यांच्या पुढे- पुढे करण्यासाठी होत आहे, त्यामुळे त्यांची विधाने गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही चव्हाण म्हणाले.

१२ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठीचा चेक कधी वटणार? मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाजपची टीका

    follow whatsapp