महाबळेश्वरमध्ये वटवाघुळात आढळला ‘निपाह’ विषाणू? सातारा जिल्ह्यात खळबळ

इम्तियाज मुजावर

• 09:20 AM • 22 Jun 2021

एकीकडे संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढा देत असताना आता जगभरातील निपाह व्हायरसच्या रुग्णांमुळे एक नवीन अडचण समोर आली आहे. त्यातच महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील जंगलभागातील गुहेत वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू सापडल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. ज्यानंतर महाबळेश्वरमध्ये स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकाराबद्दल स्थानिक जिल्हाधिकारी […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढा देत असताना आता जगभरातील निपाह व्हायरसच्या रुग्णांमुळे एक नवीन अडचण समोर आली आहे. त्यातच महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील जंगलभागातील गुहेत वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू सापडल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. ज्यानंतर महाबळेश्वरमध्ये स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकाराबद्दल स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभागाला कल्पनाच देण्यात आली नव्हती.

हे वाचलं का?

जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील National Institute of Virology (NIV) च्या शास्त्रज्ञांनी मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील गुहेत वटवाघळ इतर प्राण्यांच्या घशातून स्वॅबचे नमुने घेतले होते. या नमुन्याची चाचणी केल्यानंतर दोन वटवाघुळांच्या स्वॅबमध्ये निपाह विषाणू सापडल्याची माहिती NIV च्या शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली.

डॉ. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात याआधी कोणत्याही वटवाघुळामध्ये निपाह विषाणू आढळला नव्हता. निपाह विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही औषध आलेलं नसल्यामुळे या विषाणूची लागण झाल्यास रुग्णाच्या मृत्यूची शक्यता ही ६५ ते १०० टक्के असते.

स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय याबद्दल अनभिज्ञ –

निपाह विषाणूच्या बातमीनंतर सध्या महाबळेश्वर, पाचगणी भागात लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या भागात लोकांना उदरनिर्वाह हा पर्यटनावर चालतो. परंतू NIV च्या शास्त्रज्ञांनी महाबळेश्वरमधून वटवाघुळच्या स्वॅबचे नमुने घेतल्याची जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि वनविभागाल माहिती नव्हती. याचसोबत वटवाघुळांमध्ये जर निपाह विषाणू आढळला असेल तर हा अहवाल एक वर्ष दाबून का ठेवण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

यासंदर्भात सातारा जिल्हा वन विभागाचे उप वनसंरक्षक मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, “निपाह व्हायरस महाबळेश्वरच्या गुहेत वटवाघुळांच्या घशातून घेतलेल्या स्वॅबमध्ये आढळला ही माहिती अद्याप आमच्यापर्यंत आलेली नाही. शास्त्रज्ञांनी यासाठी आमच्याकडे कोणतीही परवानगी घेतलेली नाही, घशातून स्वॅब घेण्याबद्दल वनविभागाला विचारण्यातच आलं नव्हतं. त्यामुळे असला कोणताही अहवाल आमच्यापर्यंत पोहचलेला नाही.”

लोकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही, तज्ज्ञांचं आवाहन –

दरम्यान वटवाघुळांवर संशोधन करणाऱ्या डॉ. महेश गायकवाड यांनी लोकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. “निपाह विषाणू हा इंडोनेशिया, मलेशिया आणि नॉर्थ ईस्ट भागात आढळतो. महाराष्ट्रातील वटवाघुळांमध्ये निपाहचा विषाणू आतापर्यंत सापडलेला नाही. NIV ने हा अहवाल प्रसिद्ध केलाय, तो पूर्णपणे वाचल्यानंतरच त्यावर बोलता येईल. परंतू असं असलं तरीही स्थानिकांनी यात घाबरण्याची गरज नाही. निपाह विषाणू हा विशेषकरुन मलेशियातील वटवाघुळांमध्ये आढळतो. तिकडची वटवाघळं जेव्हा फळं खाऊन खाली फेकतात आणि ती फळं कोणी माणसाने खाल्ली तर त्यांना निपाहचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे लोकांनी उगाच वटवाघुळ राहतात तिकडे दगड मारायला जाणं असे प्रकार करु नयेत.”

    follow whatsapp