एक लाख एसटी कर्मचारी आहेत, अंगावर आले तर सरकार काय करेल?-राज ठाकरे

मुंबई तक

• 09:29 AM • 13 Dec 2021

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक चार महिने पगार न घेता राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांशी सरकार अरेरावीची भाषा करतं आहे. मेस्मा लावू अशी अरेरावीची भाषा योग्य नाही. एक लाख कर्मचारी आहेत, उद्या अंगावर आले तर काय कराल? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते […]

Mumbaitak
follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

चार महिने पगार न घेता राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांशी सरकार अरेरावीची भाषा करतं आहे. मेस्मा लावू अशी अरेरावीची भाषा योग्य नाही. एक लाख कर्मचारी आहेत, उद्या अंगावर आले तर काय कराल? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढंच नाही तर या प्रकरणी आता उद्धव ठाकरेंनी भूमिका घेऊन बोललं पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एसटी संप असो की अमरावती घटना हे सगळे महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न-संजय राऊत

एसटीच्या संपाची मी माहिती घेतली आहे. सगळ्या संघटना बाजूला करून हा संप सुरू आहे. लोकांसाठी राज्य असतं, त्यांच्याशी अरेरावीची भाषा बोलण्यासाठी नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत? त्यांचं म्हणणं काय आहे ? ते समजून घेतलं पाहिजे. अरेरावीची भाषा, मेस्मा लावण्याची भाषा केली जाते आहे. ही भाषा मुळीच योग्य नाही. खासगीकरण करण्यापेक्षा एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा, ते तुम्ही करणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आणि अरेरावीची भाषा करणार. एक लाख कर्मचारी जर अंगावर आले तर काय कराल? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. तसंच एसटीतील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय या गोष्टी सुधारणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले राज ठाकरे?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. त्यावेळी एसटी संपाबाबत आमचा विषय निघाला होता, असं सांगतानाच एसटीच्या संपाबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिणार आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने या विषयावर त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं त्यांनी सांगितलं.

कोव्हिडच्या नियमांबाबत सगळाच गोंधळ

कोव्हिड प्रतिबंधाच्या नियमांबाबत कुणाचा कुणाला पायपोसच नाही. यांना सूट द्यायची, त्यांना सूट नाही द्यायची. थिएटरमध्ये मास्क लावायचा, एक खुर्ची मोकळी सोडायची हा नियम आहे. मात्र हाच नियम रेस्तराँमध्ये लागू नाही. रेस्तराँमध्ये मास्कही लावता येत नाही कारण मास्क लावला तर खाणार कसं? थिएटरमध्ये मास्क लावावा लागल्याने अनेकांना प्रॉब्लेम झाला असेल असा टोला राज ठाकरेंनी लगावल्यानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला.

मनसे आणि भाजपची युती होणार का? यावरही त्यांनी थेट भाष्य केलं. या युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स काय हे समजत नाही. युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्याबाबत मला काहीच माहीत नाही. मनसेने नाशिकमध्ये काम केलं होतं. ते नाशिककरांनी लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.

    follow whatsapp