ड्रायव्हरनं समृद्धी महामार्गावर कंटेनर आडवा का लावला? व्हिडीओ व्हायरल, सर्व स्टोरी

मुंबई तक

• 04:04 PM • 13 Aug 2026

समृद्धी महामार्गावर आरटीओच्या कारवाईच्या रागात एका कंटेनर चालकाने थेट रस्त्यावरच गाडी आडवी लावून वाहतूक रोखल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

Google CTA

Wardha Truck Video : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर जवळ समृद्धी महामार्गावर एका संतापलेल्या कंटेनर चालकाने थेट आपला भलामोठा कंटेनर रस्त्याच्या मधोमध आडवा लावून वाहतूक रोखल्याची धक्कादायक घटना घडली. आरटीओ पथकाने कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे संतापलेल्या चालकाने हे पाऊल उचलले. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या या कंटेनरला सावंगी परिसरात पोलिसांनी थांबवले होते. कारवाईनंतर आरटीओ पथक निघून गेल्यावर, संतापलेल्या चालकाने दुपारी साडेचारच्या सुमारास महामार्गावर कंटेनर आडवा लावला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल तास ते दीड तास पूर्णपणे ठप्प झाली होती.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कंटेनर आडवा लावल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. संबंधित चालकाने आपली अडचण इतर ट्रक चालकांना सांगितल्यानंतर, त्यांनीही त्याला पाठिंबा दिला. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सावंगी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने हा मोठा कंटेनर बाजूला करून तासभरानंतर वाहतूक पूर्ववत केली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी या बेजबाबदार कृत्याबद्दल फरार कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.