Uttarakhand Flood : संपूर्ण पूल वाहून गेला, कॅमेऱ्यात धडकी भरवणारे दृश्य कैद

मुंबई तक

• 04:23 PM • 13 Aug 2026

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराच्या परिस्थितीचा तडाखा पाहायला मिळत आहे. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात एक संपूर्ण पूल वाहून गेल्याचं धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. काही क्षणांतच पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाहता पाहता पूल पाण्यात कोसळून वाहून गेला.

Google CTA

Uttarakhand Flood News : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील तमाक नाल्याला मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे अचानक भीषण पूर आला. या पुराच्या तीव्र प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचा बेली ब्रिज कोसळला. हा पूल जोशीमठाला सीमावर्ती भागांशी जोडणारा एकमेव मार्ग होता. पूल कोसळल्यामुळे जुम्मा आणि नीतीसह सुमारे बारा गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. या घटनेदरम्यान बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे चालक पंकज हे पूर पाहत असताना पूल कोसळल्याने पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. त्यांच्यासोबत एक वाहनही वाहून गेले असून, सध्या शोधमोहीम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या तुकड्यांना तात्काळ मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. पूल कोसळल्यामुळे प्रशासनाने आजूबाजूच्या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. संपर्क तुटलेल्या बारा गावांमध्ये अन्नधान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके बेपत्ता चालकाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.