Maharashtra Politics Live Updates : शपथविधीवेळी मुनगंटीवारांच्या पडले पाया, आता अमोल कोल्हे म्हणतात..

मुंबई तक

03 Jul 2023 (अपडेटेड: 03 Jul 2023, 03:37 PM)

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या तटबंदीचं काम सुरू केलं आहे. याची सुरूवात शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन केली आहे.

Sharad pawar vs ajit pawar : power tussle in nationalist congress party

Sharad pawar vs ajit pawar : power tussle in nationalist congress party

follow google news

Maharashtra Political Crisis Latest News Updates : विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी त्यांच्याबद्दल उठत असलेल्या राजकीय वावड्या 2 जुलै रोजी खऱ्या ठरवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या तटबंदीचं काम सुरू केलं आहे. याची सुरूवात शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन केली आहे.

हे वाचलं का?

Maharashtra Political Crisis Live News : शपथविधीवेळी मुनगंटीवारांच्या पडले पाया, आता अमोल कोल्हे म्हणतात..

अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. यावेळी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह जवळपास 40 आमदारांचा अजित दादांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत खासदार अमोल कोल्हेंनीही अजित पवारांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थितीत राहून त्यांना पाठिंबा दिला होता. यावेळी ते भाजप नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही पाया पडले होते. पण, आज (3 जुलै) मात्र अमोल कोल्हेंच्या एका ट्वीटमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीत पुन्हा वापसी केली आहे. खासदार अमोल कोल्हेंनी ‘मी शरद पवार यांच्यासोबत’ असल्याचं म्हटलं आहे. तसंच ट्वीटमध्ये व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘जेव्हा मन आणि विचारांचं युद्ध होतं तेव्हा आपल्या हृदयाचे ऐका. कदाचित विचार कधी कधी नैतिकता विसरते. पण हृदय कधीच विसरत नाही.’ अमोल कोल्हेंच्या या ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी रिट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी रिट्वीटमध्ये ‘एक मोहरा परत’ असं लिहिलं आहे.

भुजबळ, वळसे पाटलांचं नाव घेत राज ठाकरेंचं शरद पवारांबद्दल स्फोटक विधान

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे. अशा स्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सत्ताबदलावर काल (2 जुलै) आक्रमक झाले. महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. पुढे अजून काय पाहावं लागेल हा विचार करुन मन धस्स होतं असंही ते म्हणाले. आज (3 जुलै) पुन्हा राज ठाकरेंनी शीवतीर्थवरून माध्यमांसमोर संवाद साधला आहे. ते म्हणाले की, ‘राज्यातील या घडामोडींचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. राज्याचं राजकारण किळसवाणं होतं चाललं आहे. राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. त्यांना मतदारांशी काही देणं घेणं नाही. मतदार का होते याचा विसर पडला आहे. स्वत: च्या स्वार्थासाठी जी तडजोड करताहेत ते महाराष्ट्राच्या जनतेने गांभीर्याने घ्यावं. पवार साहेबांचा पाठिंबा असल्याशिवाय दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे असंच जाणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही.’ असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.

अजित पवारांनी घेतली शपथ, अमोल मिटकरींची भूमिका काय?

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवत काल (2 जुलै) थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अशा स्थिती अमोल मिटकरींनीही अजित दादांसोबत असल्याचे सांगितले. आज (3 जुलै) माध्यमांसमोर ते म्हणाले की, ‘राजभवनामध्ये तुम्ही माझा वन टू वन केला. तुम्ही स्वत: हसत होता, मी तोंड लपवणाऱ्यांपैकी नाहीये. मी निदड्या छातीनं बोलणारा माणूस आहे. राजभवनमध्ये माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजित दादा शपथ घेत आहेत आणि माझं काम आहे. मला आमदार म्हणून पक्षाने ओळख दिलेली आहे दादांनी मला प्रत्येकवेळी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मी आलो आहे. महाराष्ट्राची जी मनातली भावना आहे ती अजित दादांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांच्यासोबत प्रत्येक गावा-पाड्यातील कार्यकर्ता आहे. शेवटपर्यंत पक्षासोबत आणि अजित दादांसोबत राहू.’

‘9 जणांवर कारवाई!’ जयंत पाटील विधानसभा अध्यक्षांमध्ये काय झालं बोलणं?

जयंत पाटील म्हणाले की, “काल (2 जुलै) ज्या 9 जणांनी पक्षाच्या धोरणाच्या विरोधी भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षासोबत (BJP) जाऊन शपथ घेण्याचं काम केलं, ते 9 जण त्याक्षणीच अपात्र होतात. त्यासंबंधीची याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांना रात्री दिली. आज (3 जुलै) सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी याचिका पोहचल्याची माहिती मला दिली आणि त्यावर ते विचार करत असल्याचंही त्यांनी मला सांगितलं आहे. आम्ही त्यांना आमचं लवकरात लवकर ऐकावं याची विनंती केलेली आहे.”

शरद पवार कराडमध्ये दाखल झाल्यानंतर काय घडलं?

 

–  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कराडमध्ये दाखल झाले आहेत. ते काही वेळातच येथील प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. शरद पवार येणार हे कळताच राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रीतिसंगमावर दाखल झाले आहेत. पवारांच्या स्वागतासाठी पृथ्वीराज चव्हाण, रोहित पाटील, रोहित पवार, जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील असे सारे उपस्थित आहेत. अशा स्थितीत आम्ही साहेबांसोबतच, अशा बॅनर्ससह प्रीतिसंगमावर शरद पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही सुरु आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. याची सुरूवात कराड येथून पवारांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ असलेल्या प्रीती संगम येथे शरद पवार पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते स्वागतासाठी हजर होते.

 

 

    follow whatsapp