चेन्नई कसोटीत कोणाला मिळणार संधी, कसं असणार प्लेईंग इलेव्हन?

मुंबई तक

• 10:11 AM • 04 Feb 2021

भारतीय क्रिकेट संघ हा आता जवळजवळ वर्षभरानंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. याची सुरुवात उद्यापासून (5 जानेवारी) चेन्नईत होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ देखील सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर भारतीय संघाचं मनोधैर्य खूपच उंचावलं आहे. तसंच भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीचं देखील पुनरागमन झालं आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा […]

Mumbaitak
follow google news

भारतीय क्रिकेट संघ हा आता जवळजवळ वर्षभरानंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. याची सुरुवात उद्यापासून (5 जानेवारी) चेन्नईत होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ देखील सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर भारतीय संघाचं मनोधैर्य खूपच उंचावलं आहे. तसंच भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीचं देखील पुनरागमन झालं आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना न खेळू शकलेला फिरकीपटू आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे देखील संघात दिसू शकतील.

हे वाचलं का?

इंग्लंडचा संघ हा भारत दौऱ्यावर 2016 सालानंतर येत आहे. त्यामुळे आता इंग्लंडच्या या नव्या संघाचा सामना करण्यासाठी टीम इंडियाने देखील कंबर कसली आहे. चेन्नई कसोटी सुरु होण्यासाठी आता 24 तासांहून देखील कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे. अशावेळी भारतीय टीम मॅनेजमेंटला अंतिम अकरा खेळाडूंची निवड करण्यासाठी बराच विचारविनिमय करावा लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ज्या-ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी-त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे आता प्लेईंग इलेव्हनमध्ये नेमकं कुणाला स्थान द्यायचं हा मोठा प्रश्न टीम मॅनेजमेंट पुढे असणार आहे. यावेळी टीमचं नेमकं कॉम्बिनेशन कसं असावं यावर क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

काही क्रिकेट विश्लेषकांच्या मते, चेन्नईची खेळपट्टी पाहता भारतीय संघ तीन स्पिनर्स आणि दोन वेगवान गोलंदाज खेळविण्याची शक्यता अधिक आहे. काही जणांच्या मते, दोन स्पिनर्स, दोन वेगवान गोलंदाज आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्यासह भारतीय संघ मैदानात उतरु शकतो.

प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश केला जाणार याची घोषणा टीम मॅनेजमेंट थोड्याच वेळात करेल. पण त्याआधी आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, टीम इंडिया कोणत्या अकरा खेळाडूंसह मैदानात उतरु शकते. स्पिनर्ससाठी नेहमीच पोषक ठरणारी चेपॉकची खेळपट्टी लक्षात घेतल्यास भारतीय संघ तीन स्पिनर्सचा संघात समावेश करु शकतं. त्यामुळे उद्याच्या सामन्यात आर. अश्विन, वॉश्गिंटन सुंदर आणि कुलदीप यादव हे तीन स्पिनर्स खेळताना दिसू शकतात. हे तीनही स्पिनर्स भारतीय खेळपट्ट्यांवर किती घातक असतात हे याआधी देखील पाहायला मिळालं आहे. त्यामुळे तीन स्पिनर्सचा सामना करणं इंग्लंडला बरंच अवघड जाऊ शकतं.

याशिवाय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा यांचा समावेश जवळपास निश्चित समजला जात आहे. पण यावेळी मोहम्मद सिराजबाबत टीम मॅनेजमेंट नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. याशिवाय फलंदाजांची निवड करताना देखील टीम मॅनेजमेंटला बरेच कष्ट पडणार आहेत.

ओपनर म्हणून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांची निवड निश्चित समजली जात आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे येऊ शकतो. तर ब्रिस्बेन कसोटी सामन्याचा हिरो ठरलेला रिषभ पंत याचा संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे तो सहाव्या स्थानी फंलदाजीसाठी येऊ शकतो. तर ब्रिस्बेन कसोटीत दोन्ही डावात जबरदस्त फलंदाजी करणारा वॉश्गिंटन सुंदर हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. तर त्यानंतर आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा हे फलंदाजीसाठी येऊ शकतात.

चेन्नई कसोटीसाठी भारताचा संभाव्य संघ (प्लेईंग इलेव्हन): शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकिपर), वॉश्गिंटन सुंदर, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा

    follow whatsapp