IPL 2022 Mega Auction : लोकेश राहुल, बिश्नोई आणि स्टॉयनिस ‘लखनऊ’च्या दरबारात दाखल

मुंबई तक

• 10:44 AM • 18 Jan 2022

आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचं मेगा ऑक्शन फेब्रुवारी महिन्यात बंगळुरुत पार पडणार आहे. या ऑक्शनसाठी आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या लखनऊ संघाने लोकेश राहुल, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस या तीन खेळाडूंची निवड केल्याचं कळतंय. ESPNCricinfo ने यासंदर्भातली बातमी दिली आहे. लखनऊचा संघ फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या लिलावात ६० कोटींच्या रकमेनिशी उतरणार आहे. लोकेश राहुलला लखनऊ संघाने १५ कोटी, […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचं मेगा ऑक्शन फेब्रुवारी महिन्यात बंगळुरुत पार पडणार आहे. या ऑक्शनसाठी आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या लखनऊ संघाने लोकेश राहुल, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस या तीन खेळाडूंची निवड केल्याचं कळतंय. ESPNCricinfo ने यासंदर्भातली बातमी दिली आहे.

हे वाचलं का?

लखनऊचा संघ फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या लिलावात ६० कोटींच्या रकमेनिशी उतरणार आहे. लोकेश राहुलला लखनऊ संघाने १५ कोटी, स्टॉयनिसला ११ कोटी तर रवी बिश्नोईला ४ कोटींचं मानधन दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संघाचं कर्णधारपद लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या लिलावात उद्योगपती संजीव गोएंका यांच्या ग्रूपने ७ हजार ९० कोटी एवढी रक्कम खर्च करत लखनऊच्या संघाची मालकी विकत घेतली होती.

याआधी लोकेश राहुलने आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. इतकच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत राहुलने एका कसोटीचं भारताचं नेतृत्व केलं. यानंतर १९ तारखेपासून सुरु होणाऱ्या वन-डे सामन्यांच्या मालिकेतही राहुलचं भारताचं नेतृत्व करणार आहे. पंजाबकडून खेळत असताना प्रत्येक सामन्यात राहुलने आपल्या फलंदाजीची चमक दाखवून दिली.

पंजाबचा संघ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही तरीही राहुलने प्रत्येकवेळी आपली छाप पाडली होती. याचसोबत युवा फिरकीपटू रवी बिश्नोईनेही पंजाबकडून खेळताना अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं होतं. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या मार्कस स्टॉयनिसनेही अनेक सामन्यात आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर दिल्लीला जिंकवून दिलं होतं. बीसीसीसीआयने अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय.

    follow whatsapp