Taliban राजवटीत क्रिकेट खेळण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघाला करावी लागणार मोठी कसरत

मुंबई तक

• 09:31 AM • 23 Aug 2021

तालिबानने अफगाणिस्तानातली सत्ता हाती घेतल्यानंतर क्रिकेट संघाचं भवितव्य काय असेल यावरुन गेल्या काही दिवसांपासून अनेक खलबतं सुरु होती. तालिबानने क्रिकेट संघाचा आपला पाठींबा दर्शवला असला तरीही तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं भवितव्य हे दहशतीखाली असणार आहे. देशातली युद्धजन्य परिस्थितीमुळे अफगाणिस्तानचा संघ आपल्या घरच्या मैदानावरचे सामने काही वर्षांपूर्वी भारतात खेळत होता. यानंतर हे सामने युएईत खेळण्यास […]

Mumbaitak
follow google news

तालिबानने अफगाणिस्तानातली सत्ता हाती घेतल्यानंतर क्रिकेट संघाचं भवितव्य काय असेल यावरुन गेल्या काही दिवसांपासून अनेक खलबतं सुरु होती. तालिबानने क्रिकेट संघाचा आपला पाठींबा दर्शवला असला तरीही तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं भवितव्य हे दहशतीखाली असणार आहे. देशातली युद्धजन्य परिस्थितीमुळे अफगाणिस्तानचा संघ आपल्या घरच्या मैदानावरचे सामने काही वर्षांपूर्वी भारतात खेळत होता.

हे वाचलं का?

यानंतर हे सामने युएईत खेळण्यास सुरुवात झाली. येणाऱ्या दिवसांमध्ये अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका श्रीलंकेच्या हंबनतोटा येथे खेळवली जाईल. परंतू अफगाणिस्तानच्या खडतर परिस्थितीमुळे क्रिकेट संघाला श्रीलंकेत पोहचण्याठी द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे.

तालिबानने सत्ता हातात घेतल्यानंतर कोणत्याही देशाचं खासगी विमान काबूलमध्ये येत नाहीये. त्यामुळे श्रीलंकेला जाण्यासाठी अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने एक नवीन प्लान आखला आहे. काबूलवरुन श्रीलंकेसाठी थेट विमानाची सोय झाली नाही तर, सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफना पाकिस्तानच्या व्हिसावर रस्ते मार्गे पाकिस्तानात पोहचावं लागणार आहे. पाकिस्तानात पोहचल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ युएईत जाऊन तिकडून मग कोलंबोत दाखल होणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंसाठी विमानाची सोय करण्याच्या प्रयत्नात आहे, परंतू सध्याची परिस्थिती पाहता विमानाची सोय होणं कठीण दिसत आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची ही मालिका सुरुवातीला युएईत खेळवली जाणार होती. परंतू आयपीएलचा उर्वरित हंगाम आणि टी-२० वर्ल्डकप या दोन स्पर्धांमुळे युएईत ही मालिका खेळवली जाणार नाही असं स्पष्ट झालं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या देशात ही मालिका खेळवण्याचा पर्याय अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला सुनावला होता परंतू अफगणिस्तान क्रिकेट बोर्डाने याला नकार देत श्रीलंकेतच मालिका खेळण्याला पसंती दिली आहे. ३ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून यात दोन्ही संघ ३ वन-डे सामने खेळणार आहेत.

दरम्यान तालिबानने देशाची सत्ता हातात घेतल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डातही सत्ताबदल झालेला दिसत आहे. क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष अझिझउल्ला फजली हे पुन्हा एकदा हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. याआधीही फजली यांनी सप्टेंबर २०१८ ते जुलै २०१९ या काळात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.

IPL 2021 : Rashid Khan आणि मोहम्मद नबी उर्वरित हंगामात सहभागी होणार

    follow whatsapp