Lok Sabha Election 2024: CM शिंदेंचे पुत्र कल्याण गमवणार की राखणार? भाजपच्या 'या' खेळीने होणार मोठा गेम!
Kalyan Loksabha: श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवणं यंदा फारसं सोप्पं नाही. कारण या मतदारसंघात भाजपची एक खेळी मोठी ठरू शकते. जाणून घ्या त्याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT
Shrikant Shinde: कल्याण: लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रातील चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी कल्याण हा मतदारसंघ सर्वात चर्चेत आहे. २००९ साली ठाण्यापासून वेगळा होतं कल्याण हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यावेळी येथून आनंद परांजपे हे निवडणू आले होते. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या मनसेने सुद्धा या मतदारसंघात एक लाख मतं मिळवली होती. तर २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एकनाथ शिंदेंनी मुलगा श्रीकांत शिंदेंना मैदानात उतरवलं होतं. तर त्यावेळचे खासदार आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीत उतरले होते. पण २०१४ ची निवडणूक एकतर्फी झाली होती.. पण पुन्हा एकदा मनसेने एक लाखांच्यावर मतं मिळवली होती आणि ती 2009 पेक्षा जास्त होती. 2019 मध्ये पुन्हा श्रीकांत शिंदे मैदानात होते, विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे उमेदवार होते. (lok sabha election 2024 can cmshinde son shiv sena mp shrikant shinde win kalyan lok sabha constituency it will be a big game to be played by bjp)
ADVERTISEMENT
यावेली मनसेने 2019 मध्ये उमेदवार उतरवला नाही. मात्र वंचितच्या उमेदवाराने 65 हजार मतं तिथे मिळवली. त्यामुळे या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुका शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. राष्ट्रवादीने ही जागा लढवलीय पण मनसेच्या उमेदवाराने या मतदारसंघात मिळवलेली मतं नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. आता २०२४ च्या निवडणुकीत मोदीचं नाव, भाजपचं संघटन, महापालिकांमध्ये असलेलं संख्याबळ, शिंदेंकडे असलेलं मुख्यमंत्रीपद, शिंदेंची संघटनात्मक बांधणी आणि संपर्क हे श्रीकांत शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. तर ठाकरेंबद्दलची सहानुभूती ही बाब मात्र त्यांना धोकादायक ठरू शकते. शिवाय जे स्थानिक नेते महायुतीत आहेत ते काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.
◆ लोकसभा निवडणूक 2009
- आनंद परांजपे (शिवसेना) - 2 लाख 12 हजार
- वसंत डावखरे (राष्ट्रवादी) - 1 लाख 88 हजार
- वैशाली दरेकर-राणे (मनसे) - 1 लाख 02 हजार
◆ लोकसभा निवडणूक 2014
- श्रीकांत शिंदे (शिवसेना) - 4 लाख 40 हजार
- आनंद परांजपे (राष्ट्रवादी) - 1 लाख 90 हजार
- राजू पाटील (मनसे) - 1 लाख 22 हजार
हे वाचलं का?
◆ लोकसभा निवडणूक 2019
- श्रीकांत शिंदे (शिवसेना) - 5 लाख 59 हजार
- बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) - 2 लाख 15 हजार
- संजय हेडाऊ ( वंचित बहुजन अघाड़ी ) - 65 हजार 572
◆ कल्याण लोकसभा क्षेत्रात निवडणुकीत महत्वाची भूमिका कुणाची?
- एकनाथ शिंदे
- रविंद्र चव्हाण
- राजू पाटील
- पप्पू कलानी
◆ महाराष्ट्रात बारामतीनंतर कोणता मतदारसंघात हॉट सीट म्हणून ओळखला जाईल तो कल्याण असेल यात काहीच शंका नाही. कारण आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे... आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी एकहाती वर्चस्व ठेवलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ असं दोनवेळा श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून आलेत. त्याआधीसुद्धा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे... पण ठाणे आणि कल्याणला बालेकिल्ला बनवण्यात ज्या व्यक्तीचा मोठा वाटा होता ते एकनाथ शिंदे ठाकरेंपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे या बालेकिल्ल्यातच पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार आहे. तसं गेल्या काही घटना या मतदारसंघात पाहिल्या... तर एक छोटी गोष्टही या मतदारसंघाचं गणित बदलू शकते.
◆ कोण आहेत मतदार ?
कल्याण लोकसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात राहतात, त्यासोबतच उल्हासनगर मध्ये सिंधी समाज आहे. अंबरनाथमध्ये मुंबई मधील चाकरमानी हा अंबरनाथमध्ये शिफ्ट झालाय, ज्याला आपण मराठी माणूस म्हणतो. त्यासोबत वारकरी समाजाची संख्या मोठी आहे. कल्याण पूर्वेत उत्तर भारतीय सोबतच कोकणी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये आगरी-कोळी व वारकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. डोंबिवलीत मिश्र वातावरण आहे. इथे राष्ट्रीय स्वयंसेवकांची संख्या मोठी आहे. तर ब्राह्मण समाजही मोठा आहे. याशिवाय कळवा-मुंब्रामध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Shivsena UBT महाराष्ट्रात जिंकणार 'या' जागा, पाहा यादी
◆ यावेळी जेव्हा शिवसेनेत दोन गट पडलेत. तेव्हा मनसेची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जातेय. शिवसेना शिंदे गटाकडून यावेळी श्रीकांत शिंदेंच उमेदवार असतील पण ते नेमकं कोण्यात निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. पण काही महिन्यांपूर्वी भाजपकडून या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे वारंवार दौरा करत होते, त्यांनी इथे बैठकाही घेतल्या. त्यावेळी भाजप नेत्यांकडून कल्याणच्या या जागेवर दावा केला गेला होता. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीत संभ्रम निर्माण झालेला आहे... इतकं काय तर भाजपने दावा केल्यानंतर स्वतः श्रीकांत शिंदेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे भाजपने इथे दावा केल्यानंतर भाजप विरुद्ध श्रीकांत शिंदे असं चित्र काही दिवस पाहायला मिळालं होतं, मात्र आता सर्व शांत झाले आहेत.
ADVERTISEMENT
◆ या मतदारसंघाचा विचार केला तर इथे भाजपचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. त्यापैकी अंबरनाथ या राखीव मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर आमदार आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी आमदार असले, तरी तिथे पप्पू कलानींचीही मोठी ताकद आहे. ओमी कलानी यांनी शिंदेंना पाठींबा दर्शवला आहे. उल्हासनगरमध्येच साई पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे जिवन इदनानी हेसुद्धा लोकसभा निवडणुकीत मताचं गणितं बिघडवू शकतात. इदनानींचा साई पक्ष सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहे.
◆ कल्याण लोकसभा : कुठे कुणाचा आमदार ?
अंबरनाथ - बालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगर - कुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (भाजप)
डोंबिवली - रविंद्र चव्हाण (भाजप)
कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील (मनसे)
मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
◆ कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघात दोन वेळा अपक्ष तर २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या गणपत गायकवाडांनी तिन्ही वेळा एकहाती विजय मिळवला आहे. त्यांची मोठी ताकद त्या मतदारसंघात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्येच शिंदेंच्या नेत्यावर गोळ्या झाडल्यामुळे इथे काय होणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.
गोळीबारानंतर गणपत गायकवाडांनी थेट जाहीरपणे शिंदेंवर आरोप केले होते. त्यामुळे ते भाजपचे आमदार असले, तरी ते युतीधर्म पाळून श्रीकांत शिंदेंना मदत करतात का? यावर शंकाच आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना कल्याण पूर्वमधून मतं मिळविण्यासाठी कसरत करावी लागू शकते. गायकवाडांचं गोळीबार प्रकरण निवडणुकीच्या मुद्द्यापैकी एक असणार हेही नक्की आहे...
◆ डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मंत्री असलेले रविंद्र चव्हाण इथे आमदार आहेत. त्यांनीच वेळोवेळी हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. तसं बोलूनही त्यांनी दाखवलं होतं. पण आता त्यांनीही श्रीकांत शिंदेंचं उमेदवार असतील. असं स्पष्ट केलंय. त्यामुळे डोंबिवलीतून मतं मिळवण्यासाठी श्रीकांत शिंदेंना रविंद्र चव्हाणांची मदत होऊ शकते. पण भाजपने अजून कोकणात उमेदवार दिलेला नाही, चर्चा अशी पण आहे की, मंत्री रवींद्र चव्हाण यांना कोकणात उमेदवारी दिली जाऊ शकते.. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणात मदत केली तर कोकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविंद्र चव्हाण यांना मदत करणार अशीही चर्चा आहे.
◆ आणखी एक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण... एकीकडे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वारंवर भेट घेत होते, दूसरीकडे या मतदारसंघाचे मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे मात्र खा. श्रीकांत शिंदेंवर टीका करतात. राजू पाटील यांनी तर लोकसभा निवडणूक लढवण्याचीही तयारी दर्शवल्याचं बोललं जातंय. जर असं झालंच तर मात्र पुन्हा मनसेचा उमेदवार हा महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्याचा सर्वाधिक फटका कल्याण ग्रामीणमध्येच शिंदेंना बसेल. त्यामुळे वरच्या पातळीवर महायुतीत मनसेना घेण्याचा विचार सुरु असल्याचंही बोललं जातंय. नुकताच राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. जर मनसे महायुतीत आली तर राजू पाटील हे श्रीकांत शिंदेंना मदत करतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे.
हे ही वाचा>> केजरीवालांनंतर ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र हादरणार!
◆ कळवा-मुंब्रा जो जितेंद्र आव्हाडांचा गड मानला जातो, तिथेही आव्हाडांचा जवळचा माणूस नजीब मुल्ला हे अजितदादांसोबत गेले आहेत. आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात फारसं सख्खं आता राहिलेले नाही. त्यामुळे मुस्लिमबहुल मानल्या जाणाऱ्या कळवा-मुंब्र्यात आव्हाडांसमोरच आव्हानं उभं राहिलं आहे. शिवाय नजीब मुल्ला हे शिंदेंच्याही जवळ गेल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इथली मतं फोडण्यात शिंदेंना आणि नजीब मुल्लांना यश येतं का? तेही लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे...
◆ अंबरनाथ या राखीव मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर आमदार आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामं इथे झाली आहेत. पण आमदार बालाजी किणीकर यांची आमदारकीसुद्धा धोक्यात आहे, आमदारांवर अंबरनाथच्या मतादारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे याचा ही फटका खासदार श्रीकांत शिंदें यांना पडू शकतो.
◆ उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी आमदार आहे. उल्हासनगरमध्ये सिंधी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतात. इथे भाजपची मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे की, भाजपचा उमेदवार ही निवडणूक लढला पाहिजे. तसेच पप्पू कलानींचीही मोठी ताकद आहे.
◆ आकडे पाहिले तर भाजपचे सर्वाधिक आमदार इथे आहेत, पण त्यापैकी श्रीकांत शिंदेंना किती आमदार मदत करतात हा प्रश्न आहे. त्यात गणपत गायकवाड समर्थक हे तर शिंदेंच्या विरोधात काम करतील असंच चित्र आहे. भाजपने संघटना बांधलीय, केंद्रीय मंत्री अनेकवेळा येऊन गेले. त्यामुळे रविंद्र चव्हाण, कुमार आयलानी हे आमदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णायक भूमिकेत असणार आहेत. आता ते उल्हासनगरमधून कोणाला सोबत घेतात. अजितदादांचे आनंद परांजपे, नजीब मुल्ला हे देखील निर्णायक भूमिकेत असतील... दुसरीकडे ठाकरेंसाठी सुभाष भोईर, जितेंद्र आव्हाड, पप्पू कलानी, बाबाजी पाटील हे निर्णायक भूमिकेत असतील... मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील काय भूमिका घेणार? यावर बरीच गणितं अवलंबून आहेत.
◆ शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं, अनेक रखडलेले प्रकल्प आहे, मतदारसंघातही त्यांचा संपर्क आहे. संघटनाही मजबूत ठेवलीय शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठा निधी त्यांनी मतदारसंघात आणलाय.. त्यामुळे त्यांची सक्रियता ही निवडणुकीत जमेची बाजू ठरू शकते.
◆ दुसरीकडे ठाकरे पिता-पुत्राचं विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे. उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघात दौरे केलेत. एका शाखेच्या वादावरून उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात आले होते. त्यावरून लक्षात येत की कल्याणमध्ये मोठा संघर्ष निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यातूनच ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी थेट आदित्य ठाकरेंनी कल्याणमधून निवडणूक लढवावी असा सूर धरलाय. आदित्य ठाकरेही अनेकवेळा इथे येऊन गेलेत. आदित्य ठाकरे हे उमेदवार झालेच तर राज ठाकरे काय करणार यावरुनही चर्चा होतेय. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा इथे उमेदवार कोण असेल यावर चर्चा रंगलीय. माजी आमदार सुभाष भोईर यांचं नाव शिवसेना ठाकरे गटाकडून आघाडीवर आहे. तर आगरी-कोळी मतांचं गणित पाहता, त्यांच्या नावाचीही चर्चा सध्या सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT