पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT किंवा CBI मार्फत करण्याची मागणी प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. या प्रकरणावर विशेष माहिती देण्यासाठी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मुंबई तकशी चर्चा करताना चित्रा वाघ असं म्हणाल्या की त्यांनी या प्रकरणात चार दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्याच्या सरकारच्या काळात राज्यात रोज हजारो मुलींचं शोषण होतं आहे त्यांना न्यायही मिळत नाही असाही आरोप चित्रा वाघ यांनी केला.
काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
७ फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात ती वास्तव्य करत असलेल्या इमारतीवरून उडी मारली. तिला रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं असता तिचा मृत्यू झाला. ती टिकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. त्यानंतर दोन दिवसातच या प्रकरणातल्या १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर भाजपने यातला एक आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचा असून त्यांचा या प्रकरणात राजीनामा घ्यावा ही मागणी सुरू केली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही वारंवार पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरून सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. अखेर २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला.
कोण होती पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही टिकटॉक आणि सोशल मीडियावर फेमस असलेली मुलगी होती. 22 वर्षांची पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पुण्यात ती शिकण्यासाठी आणि इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात वास्तव्य करत होती. ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पुण्यातल्या हेवन पार्क या इमारतीत ती वास्तव्य करत होती याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारली. जखमी अवस्थेतल्या पूजाला रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. पूजाच्या आत्महत्येनंतर कोणतीही सुसाईड नोट अथवा मेसेज असं सापडल्याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.