MNS-Shivsena UBT: 'मीडियाशी अजिबात बोलायचं नाही..', थेट आदेश, राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय?
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अजिबात मीडियाशी बोलायचं नाही असा आदेश राज ठाकरें यांनी दिला आहे. शिवसेना UBT सोबत युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केलेलं हे ट्वीट अत्यंत महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (8 जुलै) एका महत्त्वाच्या ट्विटद्वारे आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि प्रवक्त्यांना कडक सूचना दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी पक्षातील कोणत्याही व्यक्तीला वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी संवाद साधण्यास, तसेच स्वतःच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर टाकण्यास बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, अधिकृत प्रवक्त्यांनी देखील राज ठाकरेंची परवानगी न घेता कोणत्याही माध्यमांशी बोलू नये, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला आहे.
हे ट्विट मनसे-शिवसेना UBT युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्यातील संभाव्य युती यावर सध्या सर्वच स्तरातून चर्चा सुरू आहे. त्याचवेळी अचानक राज ठाकरेंनी अशा स्वरूपाचे आदेश दिल्याने सर्वांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत.
हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?
राज ठाकरेंचं नेमकं ट्विट काय?
राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, "एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही. "
राज ठाकरेंच्या या आदेशामुळे पक्षातील सर्वांचे लक्ष आता राज ठाकरेंच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.










