उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून ते राहत्या घरी उपचार घेत आहेत. विशेष बाब म्हणजे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करुन घेण्याचं आवाहन दिवेगावकर यांनी केलं आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते या काळात पूर्ण सुट्टी घेणार नसून वर्क फ्रॉम होम करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना ताप आला, ज्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं. यानंतर दिवेगावकर यांनी स्वतःची कोरोना चाचणी करवून घेतली ज्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली होती. लोक मास्क न घालता गर्दी करत होते. विनंती केल्यानंतर लोकं मास्क घालायचे, याचाच परिणाम आपल्यावर झाल्याचं दिवेगावकर यांनी म्हटलंय. यावेळी बोलत असताना सर्व फ्रंट लाईन वर्कर्सनी स्वतःची काळजी घेऊन कोणतीही लक्षणं अंगावर न काढता स्वतःची तपासणी करुन घेण्याचं आवाहन दिवेगावकर यांनी केलंय.
दरम्यान महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य आणि केंद्र शासनाची नवीन नियमावली प्राप्त झाली असून उस्मानाबादमध्येही या नियमांचं कठोर पालन केलं जाणार असल्याचं दिवेगावकर यांनी स्पष्ट केलं.