बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमक हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरे पुढे नेऊ शकतात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सध्या साधू संतांच्या भेटी वाढू लागल्या आहेत. कोव्हिडच्या काळात विश्व हिंदू परिषदेचे नेतेही राज ठाकरेंना येऊन भेटले होते. मंदिरं उघडण्याची मागणी जेव्हा भाजप करत होतं त्या काळातही अनेकांनी राज ठाकरेंना भेटून ही मागणी करण्यास सांगितलं होतं. त्याचसोबत गाझियाबादमधल्या साध्वी कांचनगिरी आणि महंत सूर्याचार्य यांनीही आत राज ठाकरेंची भेट घेतली. जुना आखाडातील साधू अशी या दोघांची ओळख आहे. त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

साध्वी कांचनगिरी आणि महंत सूर्याचार्य यांचं हे स्पष्ट म्हणणं आहे की भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. त्यासाठी त्यांना राज ठाकरे मदत करू शकतात. राज ठाकरेंमध्ये या दोघांना बाळासाहेब ठाकरेंचं रूप दिसतं. आता 2019 नंतर महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यानंतर राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आपला पक्ष चालवणार हे ठरवलं आहे का? तसंच महाराष्ट्रात हिंदुत्वासाठी काही जमीन शिल्लक राहिली आहे का? हे दोन मुद्दे त्यामुळे चर्चेत आहेत.

हे वाचलं का?

राज ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जातील अशीही चर्चा आहे. आता या मुद्द्याच्या आधारावर मनसेतले अनेक नेते भाजप आणि मनसेच्या युतीचं सूतोवाच करत आहेत. त्यासंदर्भातही काय होणार हा प्रश्नही आहेच. राज ठाकरे गाझियाबादमधून साध्वी कांचनगिरी आणि महंत सूर्याचार्य यांना भेटले. कांचनगिरी यांना असं वाटतं की राज ठाकरेच बाळासाहेब ठाकरेंचं रूप आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत राज ठाकरेच मदत करू शकतात असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी डिसेंबर महिन्यात राज ठाकरे अयोध्येला जाऊ शकतात अशीही भूमिका मांडली. मात्र त्याचसोबत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांमध्ये साशंकता आहे. मनसेसोबत जायचं की नाही हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. हा मुद्दा आहे परप्रांतीयांचा किंवा उत्तर भारतीयांचा. मुंबईत मनसेने पावलं रोवली ती हाच मुद्दा पुढे करून.. त्यामुळे भाजप मनसे एकत्र येईल का? अशी शंका उपस्थित होते.

मात्र अनेक नेते सांगत आहेत की नाशिकमध्ये युती झाली आहे. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांची मदत घेतली आहे, एकमेकांना मदत केली आहे. त्यामुळे परप्रांतीयांचा मुद्दा गैरलागू आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणूक आल्यानंतर हा मुद्दा पुढे येतो आहे. याबाबतही साध्वी कांचनगिरी यांनी सांगितलं की राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांच्याबाबत काही गैरसमज होते जे आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर भारतीय, बिहारी लोकांबाबत आमच्या मनात राग नव्हता त्यांनी त्यांची राज्य विकसित करावीत एवढीच राज ठाकरेंची भूमिका होती असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं हे वक्तव्य सूचक आहे असंच म्हणता येईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मीडियाने याबाबत चुकीचा प्रसार करून राज ठाकरेंची प्रतिमा उत्तर भारतीय विरोधी अशी रंगवली अशीही भूमिका बाळा नांदगावकर यांनी घेतली. अर्थात एक गोष्ट स्पष्ट आहे की 2019 नंतर मनसेने जो झेंड्याचा रंग भगवा केला त्यामुळे आता मनसेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आपल्या पक्षाला जोपासायचं आहे. त्यांना हे तपासून बघायचं आहे की आता आपल्यालाही शिवसेनेप्रमाणेच आपल्यालाही कात टाकता येते का? याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

1985 मध्ये शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर मुंबई महापालिका काबीज केली होती. त्याआधीचा पाच वर्षांपूर्वीचा काळ हा अत्यंत जिकिरीचा काळ होता. 1978 नंतर शिवसेनेला गळती लागली होती. अगदी शिवसेनेचं अस्तित्व राहणार की नाही इथवर चर्चा त्या काळात झाल्या होत्या. मात्र 1985 मध्ये मुंबई महापालिका काबीज केल्यानंतर शिवसेनेला जीवनदान मिळालं आणि 1986 नंतर भाजपने रामजन्मभूमीचा मुद्दा हा राजकीय मुद्दा म्हणून घेण्यास सुरूवात केली, त्यावेळी शिवसेनेला हे लक्षात आलं की भाजप जे करू शकत नाही ते शिवसेना करू शकते. त्यामुळे हिंदू मतं मागण्यासाठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी प्रचार सुरू केला. काही इलेक्शन पिटिशनमध्ये त्यांना झटका बसला. मात्र राम मंदिराचं आंदोलन जसं वाढत गेलं तसा त्याचा फायदा महाराष्ट्रात शिवसेनेला होऊ लागला. कारण जेवढी आक्रमक भूमिका महाराष्ट्रात त्या काळी शिवसेना घेत होती तेवढी आक्रमक भूमिका त्या काळात भाजपने घेतली नाही. ही गोष्ट वारंवार समोर आली.

भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा हा देशभर मोठा केला आणि त्याचा फायदा घेतला ही बाब खरी आहेच. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेचं वर्चस्व वाढलं ते याच मुद्द्यामुळे. कणखर, कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेचीच प्रतिमा समोर आली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट हे बिरूद लागलं ते कायमचंच. अनेक शिवसैनिकही त्यांना याच नावाने हाक मारत.

आता म्हणजेच 2014 नंतर परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेला ही गोष्ट समजली की हिंदुत्ववादी पक्ष ही आपली जागा आता भाजपने व्यापली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एक चित्र असं पाहण्यास मिळालं की प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मनसे, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पाचही प्रमुख पक्षांनी स्वबळ आजमावलं. या निवडणुकीत हे सिद्ध झालं की भाजपकडे मूळ हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहिलं गेलं. याचं महत्त्वाचं कारण होतं की भाजपच्या पाठिशी नरेंद्र मोदी नावाचा करीश्मा उभा राहिला होता.

नरेंद्र मोदी हाच करीश्मा त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत दिसून आला. मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा आली तेव्हा आत्तापर्यंत हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेला मतदान करणारे जैन, गुजराती किंवा उत्तर भारतीय मतंही भाजपकडे गेली. शिवसेनेलाही ही बाब लक्षात आली. शिवसेनेचे 95 टक्के नगरसेवक मराठी मतं एक गठ्ठा असलेल्या वॉर्ड्समधूनच निवडून आले. याऊलट भाजपचे नगरसेवक इतर प्रांतीय, इतर भाषीय एक गठ्ठा मतं असलेल्या विभागातून निवडून आले. त्यानंतर शिवसेनेला हे समजलं की हिंदुत्ववादाची स्पेस आपल्या ताब्यात भाजपने घेतली.

प्रभू राम मंदिराच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरता येईल का? याचा प्रयत्नही शिवसेनेने करून पाहिला. मात्र 2019 च्या निवडणुकीत हे पुन्हा स्पष्ट झालं की भाजपसोबत असताना हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलला तरच त्याचा फायदा होतो. स्वतंत्रपणे हिंदुत्ववादी असलेली प्रतिमा आपल्याला तारू शकत नाही हे शिवसेनेला समजलं. त्यामुळेच कुठेतरी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं राजकारण सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं आहे.

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही असं उद्धव ठाकरे सांगतात. परवाच झालेल्या दसऱा मेळाव्यातही त्यांनी नव हिंदुत्व काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. संघाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. तरीही हिंदुत्वाची जी स्पेस आहे ती रिकामी झाली आहे हे विसरता येणार नाही. आताचं आमचं हिंदुत्व समंजस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतो आहे. आक्रमक हिंदुत्वाची स्पेस योगी आदित्यनाथ किंवा इतर लोकांच्या माध्यमातून भाजपने स्वतःकडे घेतली. आता राज ठाकरे आणि त्यांचे नेते यांनी हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. आम्ही स्पष्टपणे ती भूमिका घेऊ शकतो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आक्रमक हिंदुत्वाची स्पेस महाराष्ट्रात आहे का? हा चर्चेचा विषय आहे. राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका अजून घ्यायला सुरूवात केलेली नाही. स्वतःच्या भाषणातून आत्तापर्यंत त्यांनी कडवट भूमिका मांडलेली नाही. अवैध बांगलादेशी, रझा अकादमी या मुद्द्यांच्याविरोधात राज ठाकरे बोलले होते. पण अल्पसंख्याक गटाविरोधात जसे आक्रमक बाळासाहेब होते तितके आक्रमक अद्याप राज ठाकरे झालेले नाहीत. सध्या तरी हेच चित्र दिसतं आहे राज ठाकरे यांची चाचपणीच सुरू आहे. आता राहिला प्रश्न तो भाजपसोबत युतीचा. युती झाली तर ती राजकारण म्हणून होईल. जर भाजपला हे वाटलं की मनसेसोबत युती करून आपण शिवसेनेला मात देऊ शकतो तर त्यांच्यासोबत भाजप नक्की जाईल. २००८ मध्ये मनसे उत्तर भारतीयांच्या विरोधात गेली होती हे विसरून ही युती होऊ शकते. राहिला प्रश्न आक्रमक हिंदुत्वाचा तर ते सर्वस्वी राज ठाकरेंच्या हातात आहे. जोपर्यंत ते आक्रमक अशी भूमिका घेत नाहीत तोपर्यंत ते कट्टर हिंदुत्वाकडे वळले आहेत असं म्हणता येणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT