जात पंचायतीचा बहिष्कार, मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुरोगामी महाराष्ट्र म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेणाऱ्या राज्याच्या ग्रामीण भागात आजही जातीचा पगडा किती मोठा आहे याचं चित्र पुन्हा एकदा पहायला मिळालं आहे. चंद्रपुरातील गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबावर बहिष्कार घातला. हा बहिष्कार त्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतरही कायम राहिला. जो कोणी त्यांना खांदा द्यायला जाईल त्यालाही बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी जात पंचायतीने दिल्यानंतर अखेरीस मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत जात पंचायतीला सणसणीत चपराक लगावली आहे.

ADVERTISEMENT

चंद्रपूरच्या भंगाराम वॉर्ड भागात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांच्या कुटुंबावर गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कार घातला होता. ओगले यांचं सोमवारी दीर्घ आजाराने निधन झालं. गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची होती. पदरात ७ मुली आणि २ मुलं असल्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाणं शक्य व्हायचं नाही. या कारणामुळे जात पंचायतीने ओगले यांच्यावर बहिष्कार घालत त्यांना आर्थिक दंड लावला.

परंतू हा दंड भरण्याची ऐपत नसल्यामुळे जात पंचायतीने ओगले यांच्या कुटुंबावर बहिष्कार घातला. सोमवारी ओगले यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातलग जमा झाले होते. परंतू इथेही जात पंचायतीने काढलेला फतवा आडवा आला. जो कोणी पार्थिवाला खांदा देईल त्याला बहिष्कृत केलं जाईल अशी धमकी दिल्यामुळे ओगले यांच्या पार्थिवाला खांदा द्यायला कोणीही पुढे येईना. अखेरीस ओगले यांच्या मुलीने पुढाकार घेऊन आपल्या बहिणींसह वडिलांच्या पार्थिवाला खांदा द्यायचा निर्णय घेतला. ओगले यांची मुलगी जयश्री ही MPSC ची तयारी करते आहे.

हे वाचलं का?

गोंधळी समाजाच्या जात पंचायतीविरोधात अनेक सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, ही जात पंचायत गोर-गरिबांकडून पैसे लुबाडणे, बहिष्कार टाकणे, त्या माध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसवण्याचं काम करते. सध्या विदर्भातील ३५ कुटुंब अशाप्रकारे जात पंचायतीचा बहिष्कार भोगत असल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

महाराष्ट्रात नेहमी फुले-शाहु-आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, सामाजिक सुधारणांचे दाखले दिले जातात. परंतू त्यात महाराष्ट्रात आज जात पंचायतीचा त्रास अशा पद्धतीने कुटुंबांना सहन करावा लागतो आहे. प्रकाश ओगले यांच्या मुलीने जात पंचायतीला आव्हान देत स्वतः आपल्या वडिलांना खांदा देण्याचा निर्णय घेत एक वेगळं उदाहरण घालून दिलंय. त्यामुळे भविष्यात असे प्रकार आटोक्यात कधी येणार हा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT