उद्धव ठाकरेंना आंदोलनावरुन टोला ते बेळगाव दौरा रद्दची घोषणा : एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kalwa Hospital : uddhav Thackeray shiv sena slams to eknath shinde.
Kalwa Hospital : uddhav Thackeray shiv sena slams to eknath shinde.
social share
google news

नवी दिल्ली : महाराष्ट्राची अवहेलना आणि महापुरूषांचा अपमानाचा निषेध म्हणून येत्या १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडी भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या या घोषणेनंतर “आम्ही विकासाच्या समृद्धी महामार्गावर गेल्यानंतर काही लोक रस्त्यावर येत आहेत”, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला. ते दिल्लीत जी-२० समिट बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

ADVERTISEMENT

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उद्धव ठाकरे यांनी आज जी-२० बैठकीकडे पाठ फिरवली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, निमंत्रण सगळ्यांनाच गेले होते. परंतु एवढी महत्त्वाची बैठक, राज्याचं हित, देशाचं हित देश प्रेम या सगळ्या गोष्टी सोडून, या बैठकीमध्ये अनुपस्थित राहून काय त्यांना दाखवायचं होतं? काय दर्शवायचं होतं? हेच देशप्रेम आहे का? हेच राज्याचं प्रेम आहे का? त्याचं वेगळं प्रेम आजच्या या कृतीतून दिसून आलेलं आहे.

आंदोलनावर टिकेचा सूर :

महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता सगळेच लोक रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर काही लोक बाहेर आले. काल मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी समृद्धी महामार्गाचं काम पाहायला गेलो होते. आम्ही विकासाच्या समृद्धी महामार्गावर गेल्यानंतर काही लोक रस्त्यावर येत आहेत, चांगली बाब आहे.

हे वाचलं का?

चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंचा बेळगाव दौरा रद्द :

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द झाला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, बेळगावच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सकाळी भूमिका जाहीर केली आहे. संबंधित मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपली भूमिका विशद केलेली आहे.

बेळगावमध्ये किंबहुना देशाच्या कुठल्याही भागांमध्ये कुणी कुणाला जाण्यापासून रोखू शकत नाही. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे, त्याचबरोबर उद्या बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. तिथल्या मराठी भाषिकांनी त्यासाठीच या दोन मंत्र्यांना बोलावलं होतं.

ADVERTISEMENT

सामंजस्याची भूमिका कर्नाटक सरकारनं घ्यायला हवी होती. पण मंत्र्यांच्या जाण्याने तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. किंबहुना महापरिनिर्वाण दिन म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक संवेदनशील बाब आहे, एक दुःखद दिवस आहे, त्याच्यामध्ये कुठे गालबोट लागू नये आणि कुणाचे भावना दुखू नये त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलला आहे.

ADVERTISEMENT

युती सरकार सीमावासियांच्या पाठिशी खंबीर उभं :

मराठी बांधवांसाठी आता जे कोणी बेळगावसाठी मीडियावर मत प्रदर्शित करतात, बेळगाव आणि सीमा बांधवांसाठी जे काही बोलतात, त्यांना माझे एवढेच सांगणं आहे त्यांनी आक्रमकपणा किंवा धाडसपणा अशा प्रकारची चर्चा आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. हा एकनाथ शिंदे बेळगावच्या लढ्यामध्ये 40 दिवस जेल भोगलेला कार्यकर्ता आहे. आज मी मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही ज्या मुख्यमंत्री धर्मादाय निधीच्या जी काही योजना बंद केल्या त्या आम्ही सुरू केल्या.

गेल्या आठवड्यामध्ये बेळगावच्या जनतेसाठी त्यांच्या महात्मा फुले आरोग्य योजना असेल त्यांना अनुदानाचा वाटप असेल हे तुम्ही बंद केलेला आम्ही सुरू केले. त्याचबरोबर बॉर्डरवर जी गाव आहेत त्यांच्यासाठी देखील राज्य सरकार म्हैसाळच्या विस्तारीकरणाची योजना आखत आहे. २ हजार कोटी रुपये त्यासाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे हे आम्हाला त्यांनी शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी बांधवांच्या मागे उभे होतो उभे आहोत ही बाळासाहेबांची शिकवण आहे. मराठी बांधवांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT