मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवाळीनंतर जाणार अयोध्येला, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुरू माँ कांचनगिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर कांचनगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला आणि त्यावेळी त्यांनी राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

राज ठाकरे हे डिसेंबर महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. हिंदू राष्ट्र बळकट करण्याच्या कार्याला राज ठाकरेंनी हातभार लावला पाहिजे अशी विनंती आज आम्ही त्यांच्याकडे केली असंही कांचनगिरी यांनी माध्यमांना सांगितलं. इतकंच नाही तर राज ठाकरे यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना अगदी स्पष्ट आहे असंही त्या म्हणाल्या.

हे वाचलं का?

राज ठाकरे यांची भेट घेण्याच्या आधी कांचनगिरी आणि सूर्याचार्य या दोघांनीही शिवाजी पार्क मैदानावरच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाला भेट दिली. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर जेव्हा कांचनगिरी यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या की राज ठाकरेंच्या मनात परप्रांतीयांविषयी द्वेष नाही. त्यांच्या बोलण्यातून आज आम्हाला हे स्पष्ट झालं. राज ठाकरे यांच्या हिंदू राष्ट्राविषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्या खूपच स्पष्ट आहेत. राज ठाकरे हे अनेकदा स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असं म्हणत असतात ते योग्यच आहे असंही त्या म्हणाल्या.

मनसेने भाजपसोबत जावं का? असा प्रश्न जेव्हा कांचनगिरी यांनी म्हटलं की, मी हिंदू राष्ट्रासाठी काम करते आहे, यापुढेही करत राहिन. राजकारणाविषयी मला माहित नाही. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आणि भाजप यांची विचारधारा जुळत असेल तर राज ठाकरेंनी नक्की भाजपसोबत जावं असं मला वाटतं. देशात नवं हिंदुत्व जन्माला येतं आहे, हे नवं हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडणारं असणार आहे त्यामुळे सगळ्या हिंदूंनी एकजुटीने एकत्र यावं असंही कांचनगिरी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

Raj Thackeray : दुसऱ्या जातीचा द्वेष वाढत जाणं हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारं-राज ठाकरे

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला ध्वज हा आपल्या पक्षाचा ध्वज म्हणून जाहीर केला तसंच त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंगही भगवा झाला. तेव्हापासून राज ठाकरे यांनी आता हिंदुत्व स्वीकारलं आहे अशा चर्चा सुरू झाल्या. तसंच राज ठाकरे हे आगामी काळात भाजपसोबत जातील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात अनेकदा रंगली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केल्यामुळे भाजपला मित्र राहिलेला नाही. तसंच शिवसेना आणि मनसे यांच्यातलं वैर सगळ्या राज्याला माहित आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे आणि भाजप हे एकत्र येऊ शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत. आता राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेतील हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT