भेदाभेद अमंगळ हा तुकारामांचा अभंगच ‘सबका साथ सबका विकास’मागची प्रेरणा-मोदी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भेदाभेद अमंगळ हा तुकाराम महाराजांचा अभंग हीच सबका साथ सबका विकास या घोषणेमागची प्रेरणा आहे असं वक्तव्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंढरपूरच्या वारीमार्गाचं भूमिपूजन केलं. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे भूमिपूजन करण्यात आलं. दिवेघाट ते मोहोळ हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 221 किलोमीटरचा आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा 130 किमी इतका आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशातल्या संतपरंपरेचं महत्त्व विशद केलं. तसंच महाराष्ट्रातल्या वारीचंही कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये कोणताही भेदाभेद नसतो, जातपात नसते. वारकरी हा सर्वांचा गुरुबंधू असतो. वारकऱ्यांची जात एकच धर्म एक आहे. त्यांचं लक्ष्यही एकच असतं विठ्ठल. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे मार्ग वेगवेगळे असले तरीही लक्ष्य असतं विठ्ठल. म्हणजे विठ्ठल गोत्रं आहे. मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्याच्यामागे हीच भावना असते. हीच महान परंपरा असते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी प्रेरित करते. पंढरपूरची अभा, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे असं प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

आपण म्हणतो ना… माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिवरी. माझं पहिलं नातं गुजरातच्या द्वारकाशी आहे. माझं दुसरं नातं काशीशी आहे. मी काशीचा रहिवासी आहे. आणि आपल्यासाठी पंढरपूर ही दुसरी काशी आहे. या भूमीत आजही देवाचा वास आहे. सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात असल्याचं संत नामदेवांनीही सांगितलं आहे. या भूमीने अनेक संत दिले. युग संत निर्माण केले. या भूमीने भारताला नवं चैतन्य दिलं, ऊर्जा दिली, असंही त्यांनी सांगितलं. भारतात नेहमीच अशा विभूती जन्माला आल्या. त्यांनी देशाला आणि जगालाही मार्गदर्शन केलं.

हे वाचलं का?

दुरिताचें तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यें पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. त्यांच्या या उक्तीप्रमाणेच आपण त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वारकऱ्यांना अधिक सुविधा तर मिळणारच आहेत. पण आपण जसं म्हणतो की रस्ते विकासाची सुरूवात असते. पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंच करणारे ठरतील याबाबत माझ्या मनात काही शंका नाही. आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग यांचा शीलान्यास झाला. अनुक्रमे पाच आणि तीन टप्प्यात हे काम होणार आहे. 350 किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे तयार होणार आहेत. या हायवेच्या दुतर्फा विशेष मार्ग वारकऱ्यांसाठी तयार केला जाणार आहे. पंढरपूरला जोडले जाणाऱ्या नॅशनल हायवेचंही लोकार्पण झालं आहे. 1200 कोटींचा खर्च झाला आहे. हा महामार्ग विठ्ठलाच्या सेवेसोबतच या संपूर्ण परिसराच्या विकासाचं माध्यम होईल असंही प्रतिपापदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT