RLD अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनाने निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकदल (RLD)पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 86 वर्षीय अजित सिंह यांची मंगळवारी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या फुफ्फुसांमधील संसर्ग वाढल्याने त्यांची प्रकृती अधिकच नाजूक झाली होती. दरम्यान, आज (6 मे) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

ADVERTISEMENT

चौधरी अजित सिंह यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस ते आयसोलेशमध्येच होते. मात्र दोनच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अजित सिंह हे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह याचे पुत्र आहेत. अजित सिंह हे बागपतमधून तब्बल 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं. दरम्यान, त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण बागपतमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अजित सिंह यांची ओळख एक मोठे शेतकरी अशीही होती.

हे वाचलं का?

चौधरी अजित सिंह यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात १९८६ पासून केली. त्यावेळी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह हे आजारी होते. १९८६ साली अजित सिंह यांना पहिल्यांदा राज्यसभेवर धाडण्यात आलं होतं. यानंतर १९८७ ते १९८८ मध्ये ते लोकदल (A) आणि जनता पक्षाचे अध्यक्ष देखील होते. १९८९ साली त्यांनी आपला पक्ष जनता दलात विलिन केला आणि ते त्याचे महासचिव बनले.

1997 साली त्यांनी राष्ट्रीय लोकदल या पक्षाची स्थापना केली आणि त्याच वर्षी ते पोटनिवडणुकीतून लोकसभेत पोहचले. १९९८ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. पण १९९९ च्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा जिंकले आणि लोकसभेत पोहचले. २००१ ते २००३ मध्ये ते अटल बिहारी सरकारमध्ये मंत्री देखील होते.

ADVERTISEMENT

२०११ ते २०१४ मध्ये ते मनमोहन सरकारमध्ये देखील मंत्री होते. २०१४ मध्ये ते मुजफ्फरनगरमधून निवडणूक लढले होते. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ ची निवडणूक देखील अजित सिंह हे मुजफ्फरनगरमधून लढले पण यावेळी देखील त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी त्यांचा पराभव भाजपचे उमेदवार संजीव बलियान यांनी केला. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा त्यांच्या पक्षाला बराच फायदा हा नुकत्याच पार पडलेल्या उ. प्रदेशमधील पंचायत निवडणुकीत झाला. यामध्ये त्यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT