Raj Thackeray : दुसऱ्या जातीचा द्वेष वाढत जाणं हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारं-राज ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात आपल्या जातीचा अभिमान वाटणं ही गोष्ट पहिल्यापासून होती. त्यात गैर काहीही नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या जातीबद्दल अभिमान आणि दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेला. हा द्वेष वाढवणं हे महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक आणि संपूर्ण प्रतिमेला धक्का लावणारं आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान आहे. मात्र त्यात ही बाब महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

जात प्रत्येकाला असते, प्रत्येक माणसाला जातीबद्दल वाटत असतं त्यात काही गैरही नाही. मात्र दुसऱ्याच्या जातीचा द्वेष बाळगणं, ठो-ठो करत राहणं हे वाढलं आहे. हे काही महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही. गेल्या 20-25 वर्षांमध्ये हे प्रमाण वाढलं आहे असंही म्हणत राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली. प्रादेशिक अस्मिता हा विषय गृहीत धरला तर आपण असं सांगतो की मी मराठी आहे. मराठी म्हणजे काय? तर मी मराठी बोलणारा माणूस आहे. तसंच तामिळ बोलणारे, बंगाली बोलणारे लोक म्हणजेच काय तर भाषा आणि त्यातून निर्माण होणारी संस्कृती ही देश निर्माण होण्याच्या आधीपासून आहे. त्या मुळात असणार आहेतच. मात्र माझी भाषा आणि माझी संस्कृती इतरांवर लादण्यासाठी दुसऱ्या भाषेला कमजोर करणं हे योग्य नाही. उत्तरेची लॉबी, दक्षिणेची लॉबी असं का हवंय आपल्याला? या सगळ्या स्पर्धेतून या गोष्टी घडल्या आणि बिघडल्या आहेत. आपल्याकडे एक देश म्हणून काही प्लानिंगच नाही.

पूर्वी प्रादेशिक अस्मिता बाजूला ठेवल्या गेल्या. आता तसं चित्र नाही. देशातले पंतप्रधानच बघा. काही सन्मानीय अपवाद वगळले तर सगळे उत्तर प्रदेशातून आहेत. मोदींचंही बघा. ते उत्तर प्रदेशातून लढले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मोदी यांनी निवडणूक लढवली उत्तर प्रदेशातून. मग दक्षिणेतले लोक म्हणतात आमच्याकडून का नाही? जो माणूस पंतप्रधान असेल त्याच्यासाठी देशातलं प्रत्येक राज्य समान मुलांसारखं असलं पाहिजे. त्यात जेव्हा भेदभाव होतो तेव्हा समतोल ढासळू लागतो. मग प्रादेशिक अस्मिता जातीपर्यंत येतात असंही राज यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

जातीच्या कारणाने, धर्माच्या नावावर लोक मतदान करत असतील तर हा समाजाचाही प्रश्न आहे. एक माणूस एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात तिथेही निवडून जातात. मग तो माणूस सरावतो. समाज म्हणून जेव्हा शिक्षा होईल तेव्हा आपली प्रगती होईल. समाज म्हणून अशा माणसांना नाकारलं गेलं पाहिजे. चांगल्या गोष्टी साहित्यातून, नाटकांमधून सिनेमातून ऐकतो. मात्र अमलात तेवढ्या प्रमाणात आणलं जात नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हिंदुत्व जेव्हा मुख्य प्रवाह झाला तेव्हा त्याला काऊंटर करण्यासाठी जातीचं राजकारण सुरू झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की साधारण ८० च्या दशकात शहाबुद्दीन नावाचे खासदार होते. त्यावेळी भिवंडीत दंगलही झाली होती. ती बांद्र्यापर्यंत आली होते. शहा बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकसभेने बदलला. अशा काही गोष्टी घडल्या.. तोपर्यंत गोष्टी बऱ्यापैकी शांत होत्या देशात. मात्र या गोष्टी वाढू लागल्या. मग या देशातल्या हिंदूंना वाटू लागलं की एकदा काय ते होऊन जाऊदेत.. वातावरणात एखादी गोष्ट असेल आणि लोकांना तुम्ही सांगू लागलात तर ती कुणी ऐकत नाही. मात्र त्यावेळी वातावरणात ती गोष्ट होती कुणी बोलत नव्हतं. त्या काळात ती गोष्ट पहिल्यांदा बोलली गेली. साधारणतः 84-85 च्या काळानंतर. त्या सगळ्या वातावरणात कुणी हाक दिली असेल तर ते बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळी अटलजी भाजपचे अध्यक्ष होते. त्यावेळी भाजपचा गांधीवादी समाजवाद होता. त्यानंतर अटलजी गेले आणि अडवाणीजी आले. त्यानंतर रथयात्रा, राममंदिर या सगळ्या गोष्टी देशाने पाहिल्या. त्या सगळ्या गोष्टी वातावरणात होत्या मग त्या गोष्टी पुढे तशा घडल्या.

ADVERTISEMENT

जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांचा ओळखीचा, अस्तित्त्वाचा भाग झाला आहे. जेम्स लेनचं उदाहरण घ्या? कोण जेम्स लेन? मात्र त्याने पुस्तक लिहिलं तो कुठून आला? बरं तो आता कोण आहे? कुठे आहे? पण त्या सगळ्या वातावरणातून मराठा समाजातल्या मुलांना-मुलींना भडकवलं गेलं. हे सगळं डिझाईन आहे. मग माळी समाज, ब्राह्मण समाज असं सगळं होऊ लागलं. इतिहास कसा चुकीचा लिहिला गेला ते सांगितलं गेलं. संदर्भ सोडूनही लिखाण झालं आहे. त्यामुळे अनेक मुलांची माथी भडकली या सगळ्या गोष्टी ठरवून झालं आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला त्या महाराष्ट्राला जाती-पातीमध्ये खितपत ठेवायचं का? हा प्रश्न आहे असंही राज ठाकरे यांनी विचारलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT