Sanjay Raut: “आता त्यांना कळेल मला अटक करून किती मोठी चूक केली, शिवसेनेचा भगवा सोडणार नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर त्यांची ऑर्थर रोड या तुरुंगातून सुटका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय होताच कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसंच आज ऑर्थर रोड तुरुंगातून शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या भांडुप येथील घरी आले. घरी येत असताना त्यांनी शिवसैनिकांसी संवाद साधला. मला अटक करून किती मोठी चूक केली आहे हे आता त्यांना कळेल असाही इशारा दिला आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

आज घरी आल्यानंतर मला वाटलं की शिवतीर्थावरच आलो. दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. १०० दिवसांनंतरही तुम्ही माझं स्मरण ठेवलंत मी तुमचा आभारी आहे. १०० दिवसांनी मी घरी आलो आहे. माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं की फक्त भांडुप किंवा मुंबईत नाही तर महाराष्ट्रातल्या शिवसैनकांमध्ये आनंद झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे महाराष्ट्राने आणि देशानं पाहिलं. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हाही तुम्ही जमला होतात. तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही.

आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका जिंकण्यासाठी

आपली शिवसेना तीन महिन्यात, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडण्याचा-फोडण्याचा प्रयत्न झाला पण ती तुटलेली नाही. आपली शिवसेना अभेद्य आहे, बुलंद आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीनेही तेच दाखवून दिलं. मशाल भडकलेली आहे. एकच शिवसेना महाराष्ट्रात राहिल ती बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची. आता त्यांना कळेल की मला अटक करून किती मोठी केली. देशाच्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक कोणती तर संजय राऊतला अटक करणं. आज न्यायालयाने सांगितलं की संजय राऊतांच अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊत य़ांचा कुठलाही गुन्हा नाही. न्यायालयाने सांगितल्यावर ज्यांनी मला अटक केली ते हायकोर्टात धावत गेले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मला कितीही वेळा अटक करा मी भगवा सोडणार नाही

मला कितीही वेळा अटक करा मी शिवसेनेला त्यागणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो, त्या भगव्यासोबतच मी जाईन. या महाराष्ट्रात आता आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. माझ्या अटकेच्या आधी दिल्लीतून आदेश आले की इसको जेलमें डालो फिर सरकार आयेगी. आता खोक्यांची गोष्ट चालली आहे. महाराष्ट्रातले बोके खोक्यांवर बसली आहे. मात्र शिवसेना त्यांना काय ते दाखवून देईल. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई महापालिका आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे लक्षात घ्या.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच खरी शिवसेना

ऑर्थर रोड तुरुंगातून निघाल्यापासून मी पाहतो आहे ती प्रचंड आहे. जी उर्जा निर्माण झाली आहे ती खरी शिवसेना आहे. सुटल्यावर उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. त्यांचा उर भरून आला होता, माझाही उर भरून आला होता. रस्त्यात जिथून मी जात होतो. त्यावेळी लोक मला नव्हते अभिवादन करत शिवसेनेला अभिवादन करत होते. आमची सिक्युरीटी काढली. मी काय कुणाला घाबरत नाही. एवढंच सांगतो मी आत्ता मला पुन्हा अटक करण्याचा प्रय़त्न होईल. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. भास्कर जाधवांना त्रास देत आहेत. किशोरीताईंना त्रास देत आहेत. आपण पर्वा करूया नको. आपण जे स्वागत करत आहात ते माझं नाही तर भगव्या झेंड्याचं स्वागत आहे असं मी मानतो. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण पक्षासासाठी वेचणार. मला चिरडणं शक्य नाही. मी बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेलं रसायन आहे हे कुणी विसरू नका.

ADVERTISEMENT

आता रडायचं नाही तर लढायचं

मी आज जमलेल्यांचा सगळ्यांचा आभारी आहे. कुणीही रडलं नाही, रडायचं नाही आता लढायचं. ही लढाई आता संपणार नाही १०३ आमदार निवडून आणल्याशिवाय. माझ्यावर ईडीने उपकारच केले अटक करून. प्रत्येक संकट ही संधी आहे हे विसरू नका. मी तुरुंगात होतो वाईट वाटलं नाही. मला माहित होतं प्रत्येक शिवसैनिक माझी वाट बघत होता. हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्याच शिवसेनेत मिळणार खोकेवाल्यांच्या नाही. ज्यांनी शिवसेना तोडली-फोडली धनुष्यबाण चिन्ह गोठवलं त्या सगळ्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचं वैभव आणि तीच ताकद आकाशाला गवसणी घालणारी आपण निर्माण करू. माझ्या अटकेने सुरूवात झाली होती आता मी सुटलो आहे आता सुसाट सुटायचं. असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे. राज्य सरकारच्या विरोधात होणाऱ्या संघर्षाची नांदीच त्यांच्या भाषणात दिसून आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT