"...तर अशांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील" राज ठाकरेंचा खरमरीत इशारा

जाणून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेमका हा इशारा का दिला आहे?
MNS Chief Raj Thackeray Warning Letter About Child Labor Issue in Maharashtra
MNS Chief Raj Thackeray Warning Letter About Child Labor Issue in Maharashtra

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी एक पत्र प्रसारित करत राज्या सुरू असलेल्या लहान मुलांच्या वेठबिगारीबाबत चिंता व्यक्त केली. शिंदे फडणवीस यांच्या सरकार तातडीने या प्रकारच्या घटनांचा छडा लावावा अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली. तसंच गरज पडली तर लहान मुलांकडून जे वेठबिगारी करून घेतात त्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील असा खरमरीत इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी पत्रात?

गेल्या काही दिवसांपासून विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातं आहे अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये लहान मुलांच्या वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशांसाठी लहान मुलांवर वेठबिगारी करण्याची वेळ यावी हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरीही ही प्रथा अस्तित्त्वात आहे आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात या घटना घडणं राज्याला शोभणारं नाही.

राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने छडा लावावा

राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तातडीने द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र हे करत असताना एकूणच जागृत समाजानेही पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे. या प्रथेच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसात तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्या महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडाही शिकवतील

या पद्धतीच्या बातम्या परत वाचायला लागू नयेत हीच इच्छा

राज ठाकरे

असं पत्र प्रसिद्ध करत राज ठाकरे यांनी सरकारला तातडीने लहान मुलांच्या वेठबिगारीकडे तातडीने लक्ष द्यावं असं आवाहन केलं आहे. आता याबाबत एकनाथ शिंदे यांनी काय करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर होते. तिथून मुंबईत परतल्यानंतर आता त्यांनी महाराष्ट्रातल्या लहान मुलांच्या वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावं असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in