Shiv Sena UBT : मिंधे गट-भाजप युतीला का माती खावी लागतेय?; अमित शाहांना टोला
अमित शाहांच्या मुंबई-महाराष्ट्र दौऱ्यावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोरदार हल्ला चढवला. सामना अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेनं अमित शाहांना थेट सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
“निवडणुका असोत अथवा नसोत, भाजपच्या नेते मंडळींचे दौरे, बैठका, चर्चा फक्त राजकीय लाभहानीचे हिशेब करण्यासाठीच असतात. विद्यमान भाजप श्रेष्ठी तर त्यांच्या भक्त मंडळींना या हिशेबात अतिहुशार आणि सत्ताकारणाच्या जुगारातील ‘चाणक्य’ वगैरे वाटतात”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई आणि महाराष्ट्र दौऱ्यावरून टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या गेल्या काही महिन्यांतील दौऱ्याबद्दल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे की, “अशा या चाणक्यांचे मुंबई-महाराष्ट्रातील दौरे अलीकडे वरचेवर होऊ लागले आहेत. कारण स्पष्ट आहे. महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’च्या तडाख्याने 2019 मध्ये त्यांचा येथील सत्तेचा घास हिरावला गेला आहे. त्यात आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबईसह इतर महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका त्यांना खुणावू लागल्या आहेत.”
महाविकास आघाडी, वज्रमूठ आणि भाजप
“2019 मधील सत्ता गेल्याची तगमग आणि आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’चा तडाखा बसण्याची भीती, यामुळे या भाजपवाल्यांचा जीव कासावीस होत असावा आणि त्यातून मुंबई आणि महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम जास्तच उतू जात असावे. पंतप्रधान मोदी मध्यंतरी कसल्या ना कसल्या उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येऊन गेले”, असं भाष्य शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केलं आहे.
हे वाचलं का?
कर्नाटक विधानसभा निवडणूक >> मल्लिकार्जून खरगेंचं ‘ते’ विधान, भाजपला जे हवं तेच घडलं?
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढे म्हटलं आहे की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही दिल्ली-मुंबई-महाराष्ट्र असे ‘अप-डाऊन’ वाढले आहे. वरचेवर ते नागपूर, कोल्हापूर, पुणे असे येत असतात. मुंबईवर तर त्यांचे विशेष प्रेम आहे. मुंबई महापालिकेवरही त्यांचा डोळा आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात त्यांनी दोनदा मुंबईला भेट दिली. रविवारच्या भेटीत त्यांनी म्हणे येथील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.”
हेही वाचा >> मुंबई वज्रमूठ सभा : “मोदीजी, तुमच्या भोकं पडलेल्या टिनपाटांना बूच घाला, अन्यथा…”, ठाकरे कडाडले
“मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची कामगिरी चांगली असेल. विकासकामांमुळे जनता भाजपकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे, वगैरे वगैरे फीडबॅक अमित शाह यांना भाजप नेत्यांनी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शाह यांनी म्हणे, भाजपमधील ‘इन्कमिंग’चाही आढावा घेतला. आता शाह किंवा त्यांच्या इतर नेत्यांनी त्यांच्या पक्षाचा, पक्षातील ‘इन्कमिंग’ वगैरेचा आढावा घ्यायचा की अन्य काही ‘जोर-बैठका’ मारायच्या हा त्यांचा प्रश्न. मात्र महाराष्ट्रात मिंधे-फडणवीस सरकार स्थापन केल्यापासून झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मिंधे गट-भाजप युतीला का माती खावी लागत आहे? या प्रश्नाचेही उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘इन्कमिंग’च्या स्वानंदात मशगुल असणाऱ्यांनी खरे तर करायला हवा”, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेने अमित शाह यांना लगावला.
ADVERTISEMENT
भाजपचा बालेकिल्ला तब्बल 29 वर्षांनी ढासळला
“विधान परिषद निवडणुकीतही चारपैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. सर्व जागा जिंकण्याच्या गमजा मारणाऱ्या भाजपला जेमतेम एक जागा मिळाली होती. त्यातही भाजपच्या दोन परंपरागत मतदारसंघांत महाविकास आघाडीचे ‘इन्कमिंग’ करण्याचा चमत्कार सुशिक्षित मतदारांनी करून दाखवला होता. मध्यंतरी भाजपच्या मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतही याच चमत्काराची पुनरावृत्ती झाली. पुण्यातील कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला तब्बल 29 वर्षांनी ढासळला. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली”, असं भाष्य शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केलं आहे.
ADVERTISEMENT
भाजप-मिंधे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’
“कालच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीतही मतदानाच्या आऊट गोइंगने भाजप-मिंधे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. राज्यातील बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. भाजप-मिंधे गटातील अनेक स्वयंघोषित मातब्बरांचे बाजार समित्यांमध्ये वर्षानुवर्षे गाडलेले तंबू मतदारांनी उखडून फेकले. मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार ‘इन्कमिंग’ आणि मिंधे गट-भाजपचे जोरदार ‘आऊट गोइंग’ होत आहे. परंपरागत मतदारांपासून नवीन मतदारांपर्यंत, शेतकरी-कष्टकऱ्यांपासून पदवीधर-सुशिक्षित मतदारांपर्यंत सगळेच भाजपपासून ‘आऊट गोइंग’ करीत आहेत हेच वास्तव आहे. तरीही कोणाला या ‘आऊट गोइंग’चे काय या वास्तवाकडे दुर्लक्ष करून ‘इन्कमिंग’च्या ‘मृगजळा’तच वावरायचे असेल तर त्यांना शुभेच्छा”, असा खोचक टोला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपला लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT