Women’s World Cup: भारताची बांगलादेशवर मात, उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग अजुनही खुला की बंद?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आज आणखी एका विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने बांगलादेशवर ११० धावांनी विजय मिळवला आहे. भारताने विजयासाठी दिलेलं २३० धावांचं आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही आणि संपूर्ण संघ ११९ धावांत गारद झाला.

ADVERTISEMENT

भारतीय संघाने यात्सिका भाटीयाचं अर्धशतक आणि स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर यांच्या खेळीच्या जोरावर २२९ धावांचा टप्पा ओलांडला. बांगलादेशकडून सलमा खातून-लता मोंडल यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारतीय संघाकडून स्नेह राणाने ४, झुलन गोस्वामी-पुजा वस्त्राकरने २-२ तर राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी १-१ विकेट घेतली.

दरम्यान भारतीय संघाच्या या विजयानंतर महिला विश्वचषक स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. विश्वचषकात प्रत्येक संघाचे साखळी फेरीत सात सामने होणार आहेत. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. मात्र इतर तीन संघांबाबत संभ्रम कायम आहे. परंतू पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने आता उपांत्य फेरीची गणितं बदलली आहेत. त्यामुळेच भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.

हे वाचलं का?

काय भारतीय महिला संघाचं उपांत्य फेरी गाठण्यासाठीचं गणित?

भारताने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात तीन सामन्यांमध्ये विजय, तर तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. परंतू असं असलं तरीही भारताचा रनरेट चांगला आहे. भारतीय संघाचा +०.७६८ असा रनरेट आहे. त्यामुळे रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीची दारं भारतीय संघासाठी अजूनही खुली आहे.

ADVERTISEMENT

भारतीय संघाचा शेवटचा सामना दक्षिण अफ्रिकेसोबत आहे. हा सामना जिंकल्यास भारताला उपांत्य फेरीत जाणं शक्य होईल. पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने म्हणजेच इंग्लंड आणि न्यूझीलंडला चांगल्या फरकाने हरवलं तर दुसरीकडे भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास उपांत्य गाठण्याच्या भारताच्या आशा कायम राहतील. जरी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेकडून हरला आणि पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले तर चांगल्या नेट रनरेटमुळे भारत पुढे असेल आणि उपांत्य फेरी गाठू शकतो.

ADVERTISEMENT

काय आहेत इतर संघांसाठी उपांत्य फेरी गाठण्याची गणितं?

दक्षिण अफ्रिका: दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत पाच सामने खेळले असून ४ सामन्यांत विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेला एक विजय मिळवायचा आहे. दक्षिण आफ्रिकेचे उर्वरित दोन सामने वेस्ट इंडिज आणि भारतासोबत असणार आहेत.

न्यूझीलंड : यजमान संघ न्यूझीलंडसाठी यंदा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग जरा अवघड दिसत आहे. न्यूझीलंडला आता फक्त पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकला तर न्यूझीलंडचे ६ गूण होतील परंतू यासाठी न्यूझीलंडला मोठा विजय मिळवावा लागणार आहे.

इंग्लंड: इंग्लंडचे दोन सामने पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आहे. त्यांना दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतील तिसरा संघ बनण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिज: वेस्ट इंडिजच्या संघाचा नेट रन रेट खूपच खराब आहे, जर त्यांनी शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेकडून गमावला तर त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा धुसर होतील. परंतू कॅरेबियन संघाने हा सामना जिंकला तर भारत आणि इंग्लंडसाठी पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT