WTC Final : विराट विरुद्ध विल्यमसन, आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोणाची आकडेवारी सरस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

World Test Championship चा अंतिम सामना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १८ तारखेला साऊदम्पटनच्या मैदानावर विराट कोहली आणि केन विल्यमसन विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. ICC च्या या महत्वाकांक्षी स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. विराट आणि विल्यमसन हे दोन्ही फलंदाज सध्या चांगल्याच फॉर्मात आहेत.

ADVERTISEMENT

अंतिम सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून देण्यात दोघांचीही भूमिका मोलाची असणार आहे. विराट आणि विल्यमसनचं फलंदाजीचं तंत्र, फटक्यांची शैली बऱ्याच अंशी सारखी आहे. त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे आणि आकडेवारीच्या निकषात कोणाचं पारडं जड आहे हे आपण पाहूयात…

विराट कोहलीने आतापर्यंत ९१ टेस्ट मॅच खेळल्या असून त्याची सरासरी ५२.३७ असून त्याने ७ हजार ४९० रन्स काढल्या आहेत. तर दुसरीकडे केन विल्यमसनने आतापर्यंत ८४ टेस्ट मॅच खेळल्या असून ५३.६० च्या सरासरीने त्याने ७ हजार १२९ रन्स केल्या आहेत.

हे वाचलं का?

घरच्या मैदानात दोन्ही खेळाडूंची कशी राहिली आहे कामगिरी?

या निकषामध्येही विराट आणि केन विल्यमसन यांची कामगिरी बऱ्याच अंशी सारखी आहे. घरच्या मैदानावर विराट कोहलीने ४३ टेस्ट मॅच खेळल्या असून ६४.३१ च्या सरासरीने विराटने ३ हजार ७३० धावा केल्या आहेत. ज्यात १३ शतकांचाही समावेश आहे. दुसरीकडे विल्यमसनने घरच्या मैदानावर ४१ टेस्ट मॅच खेळल्या असून ६५.३१ च्या सरासरीने त्याने ३ हजार ७८८ धावा केल्या असून त्याच्याही नावावर १३ शतकं जमा आहेत.

ADVERTISEMENT

परदेशात कोण आहे सरस?

ADVERTISEMENT

या निकषात विराट केन विल्यमसनपेक्षा आघाडीवर आहे. केन विल्यमसनच्या विदेशात ११ सेंच्युरी आहेत तर विराटच्या नावावर १४ सेंच्युरी जमा आहेत. परंतू केन विल्यमसनसाठी एक बाजू जमेची आहे ती म्हणजे परदेशातील ११ सेंच्युरीपैकी दोन सेंच्युरी विल्यमसनने तटस्थ मैदानावर लगावल्या आहेत. विराट कोहली मात्र आतापर्यंत एकदाही तटस्थ मैदानावर खेळलेला नाही. यंदाची WTC Final ही विराट कोहलीसाठी पहिली तटस्थ टेस्ट मॅच असणार आहे. त्यामुळे तटस्थ मैदानावरचा अनुभव विल्यमसनसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

एकमेकांविरुद्ध खेळत असताना दोन्ही खेळाडूंची कामगिरी कशी राहिली आहे?

आतापर्यंत कर्णधार म्हणून विराट कोहली भारताला एकही महत्वाचं विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही. WTC Final च्या निमीत्ताने ही सुवर्णसंधी विराटकडे आहे. भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये न्यूझीलंडची कामगिरी उल्लेखनीय आहे. विराट आणि केन विल्यमसन एकमेकांविरुद्ध खेळत असताना दोघांच कामगिरीही उल्लेखनीय राहिलेली आहे.

विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध ९ टेस्ट मॅच खेळला असून यात त्याने ७७३ रन्स केल्या असून त्याने ३ शतकं झळकावली आहेत. केन विल्यमसनने भारताविरुद्ध ११ टेस्ट मॅच खेळल्या असून यात त्याने ७२८ रन्स केल्या असून त्याच्या नावावर २ शतकं जमा आहेत.

विराटने आजवर खेळलेल्या ९१ पैकी ४७ टेस्ट मॅच भारताने जिंकल्या आहेत. दुसरीकडे केन विल्यमसनने आतापर्यंत न्यूझीलंडकडून ८४ टेस्ट मॅच खेळल्या आहेत ज्यापैकी ३६ टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली आहे. कर्णधार म्हणून विराटने भारताचं ६० कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं असून यापैकी ३६ टेस्ट मॅच भारताने जिंकल्या आहेत तर केन विल्यमसनने आतापर्यंत ३६ टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व केलं असून २१ टेस्ट मॅच संघाला जिंकवून देण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्यामुळे या दोन कुशल नेतृत्वांच्या लढाईत अंतिम फेरीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT