अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात विजय मिळवत धडाकेबाज कामगिरीची नोंद केली. यानंतर भारतीय संघासमोर आता इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ फेब्रुवारीपासून दोन्ही टीममध्ये ४ टेस्ट मॅचच्या सिरीजला सुरुवात होणार आहे. विराट कोहली या सिरीजमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच इंग्लंडच्या टीममध्ये विराट कोहलीची दहशत तयार झाली आहे.
विराट कोहलीविरुद्ध इंग्लंडच्या बॉलर्सना बेस्ट कामगिरी करावी लागणार असल्याचं मत बॅटींग कोच ग्रॅहम थॉर्पने व्यक्त केलं आहे. “विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू आहे, यात काही वादच नाही. होम कंडीशनमध्ये खेळत असताना विराट कोहलीला फायदा मिळेल. त्यामुळे आमच्या बॉलर्सना विराटविरुद्ध आपली बेस्ट कामगिरी करावी लागणार आहे. बॅटींग करताना आम्हाला मोठी धावसंख्या उभी करुन नंतर इंडियाला प्रेशरमध्ये कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करावा लागणार आहे.”
भारतात दाखल होण्याआधी इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत २-० ने पराभूत केलं. जो रुटसह अनेक महत्वाचे इंग्लिश प्लेअर सध्या फॉर्मात आहे. परंतू भारताविरुद्ध खेळताना त्यांना संघर्ष करावा लागेल. ५ फेब्रुवारीपासून पहिल्या टेस्ट मॅचला चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होणार आहे.