शायनिंग मारत स्टंट केला, कारसह थेट 300 फूट दरीत कोसळला.. हादरवून टाकणारा Video तुम्ही पाहिला का?
साताऱ्यामधून व्हिडिओ काढताना गाडीसोबत केलेला स्टंट जीवावर बेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक तरुण आपल्या चारचाकी कारसोबत स्टंट करताना तब्बल 300 फूट दरीत कोसळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रीलसाठी व्हिडीओ काढणं जीवावर बेतलं

गाडीसोबत स्टंट करताना तरुण कारसह 300 फूट दरीत कोसळला
Satara News: साताऱ्यामधून व्हिडिओ काढताना गाडीसोबत केलेला स्टंट जीवावर बेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर सातारा जिल्ह्यात बरीच प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत आणि त्यापैकीच एक स्थळ म्हणजे सडावाघापूर. या ठिकाणी फिरायला आलेला एक तरुण आपल्या चारचाकी कारसोबत स्टंट करताना तब्बल 300 फूट दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.
नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी खोल दरीत...
या घटनेतील पीडित तरुणाचं नाव साहिल अनिल जाधव असून तो कराड तालुक्यातील गोळेश्वरचा रहिवासी आहे. बुधवारी (10 जुलै) सायंकाळी पाटण ते सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी येथील टेबल पॉइंटवर हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी रिल्स काढण्यासाठी आपल्या गाडीसोबत स्टंट करताना नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी खोल दरीत कोसळली आणि यामधील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सह्याद्री रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
रील काढण्यासाठी स्टंट करताना तब्बल 300 फूट खोल दरीत पर्यंटकांची गाडी कोसळून हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. त्यामध्ये, हा युवक कारचा रेस वाढवून गाडी एकाच जागी फिरवत असल्याचे दिसून येते. फिरता फिरता रिव्हर्स गेअरमध्ये गाडी दरीत कोसळल्याचंही दिसत आहे.
हे ही वाचा: 'श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस', शिरसाट बोलून गेले... अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला.. तुम्हाला क्रोनोलॉजी समजली का?
रील काढण्याच्या नादात स्टंटबाजी
सडावाघापूर पठारावरील निसर्ग सौंदर्या बरोबर उलटा धबधबा, येथील परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. पाटणपासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर पाटण-सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गाच्या मधोमध असलेला सपाट भूभाग 'टेबल पॉइंट' म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाच्या दोन्ही बाजूला खोल दऱ्या असून, उलटा धबधबा पाहण्यासाठी व फोटोसेशनसाठी दररोज अनेक पर्यटक येथे थांबतात. मात्र, याठिकाणी फोटो आणि व्हिडीओ काढण्याच्या नादात काही तरुण पर्यटकांची स्टंटबाजी वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. यातूनच गंभीर घटना घडल्याच्या बातम्या समोर येत असतात.
हे ही वाचा: Mumbai Weather: मुंबई आणि परिसरात कसा बरसेल पाऊस? एका क्लिकवर हवामानाचे नेमके अपडेट!
पर्यटकांची मागणी
मात्र, या टेबल पॉइंट परिसरात कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने पर्यटकांसाठी हा भाग अतिशय धोकादायक ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीही येथे अपघात झाले असून प्रशासनाकडून कोणत्याही सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने कठडे बसवावेत, सुरक्षा फलक लावावेत, अशी जोरदार मागणी केली आहे.