Personal Finance Land Investment: जमीन, प्लॉट किंवा घर खरेदी करायचं म्हटलं की मोठ्या भांडवलाची गरज भासते. त्यात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, देखभाल, कायदेशीर कागदपत्रं आणि विक्रीच्या वेळी योग्य ग्राहक मिळण्याची चिंता असते. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही प्रत्यक्ष जमीन खरेदी करणं शक्य होत नाही. मात्र, जमीन किंवा प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर न घेता रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत.
ADVERTISEMENT
REIT म्हणजे काय?
यातील सर्वात चर्चेतला पर्याय म्हणजे REIT अर्थात Real Estate Investment Trust. SEBIच्या माहितीनुसार, REITच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष प्रॉपर्टी न खरेदी करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येते. REITकडे व्यावसायिक इमारती, ऑफिस स्पेस, मॉल्स यांसारख्या मालमत्तांचा पोर्टफोलिओ असू शकतो. या मालमत्तांमधून मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नातून गुंतवणूकदारांना वितरण मिळू शकते. REIT युनिट्स शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येतात.
म्हणजेच, एक संपूर्ण इमारत किंवा जमीन खरेदी करण्याऐवजी त्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये छोटा हिस्सा घेण्याची कल्पना इथे लागू होते.
SM REIT : छोट्या प्रॉपर्टीजमध्ये वेगळा पर्याय
अलीकडच्या काळात Small and Medium REITs म्हणजेच SM REITs हा पर्यायही समोर आला आहे. SEBIने छोट्या आकाराच्या रिअल इस्टेट मालमत्तांना अशा माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र नियामक चौकट आणली आहे.
मात्र, हा पर्याय सामान्य REITसारखा कमी तिकिटाचा आहे असं समजणं चुकीचं ठरू शकतं. SEBIच्या कागदपत्रांनुसार SM REIT योजनेच्या प्रत्येक युनिटची किमान किंमत ₹10 लाख असण्याची तरतूद आहे. त्यामुळे हा पर्याय सर्वच मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी योग्य असेलच असं नाही.
जमीन खरेदीपेक्षा हा पर्याय कसा वेगळा?
जमीन खरेदीमध्ये तुमच्याकडे एखादी विशिष्ट मालमत्ता असते. REITमध्ये मात्र तुम्ही व्यावसायिक रिअल इस्टेटच्या पोर्टफोलिओमध्ये युनिट्सच्या माध्यमातून सहभागी होता. त्यामुळे मोठं भांडवल एकाच प्लॉटमध्ये अडकवण्याऐवजी रिअल इस्टेट एक्स्पोजर मिळवण्याचा हा वेगळा मार्ग ठरू शकतो.
पण जोखीम विसरू नका!
REIT म्हणजे FDसारखा हमखास परतावा देणारा पर्याय नाही. युनिटची बाजारातील किंमत वर-खाली होऊ शकते. प्रॉपर्टीची भाडे मिळकत, रिकाम्या जागा, व्याजदर, बाजारातील परिस्थिती आणि संबंधित ट्रस्टच्या कामगिरीचा परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी मालमत्तांचा प्रकार, कर्ज, उत्पन्न, वितरणाचा इतिहास, शुल्क आणि जोखीम तपासणं महत्त्वाचं आहे. SEBIदेखील गुंतवणुकीपूर्वी risk-return profile आणि due diligence तपासण्याचा सल्ला देते.
थोडक्यात, जमीन खरेदी न करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर REIT हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी अभ्यास करण्यासारखा पर्याय आहे. मात्र, ‘जमीन वाढते म्हणजे REITही हमखास वाढेल’ असा सरळ निष्कर्ष काढू नये.
ADVERTISEMENT











