26/11 सारखा दहशतवादी हल्ला, रशिया हादरलं.. 40 नागरिक ठार

रोहित गोळे

23 Mar 2024 (अपडेटेड: 23 Mar 2024, 01:37 AM)

मॉस्कोजवळील कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात किमान 40 लोक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाल्याचं समजतंय.

रशियात दहशतवादी हल्ला

रशियात दहशतवादी हल्ला

follow google news

मॉस्कोः रशियन वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, लढाऊ पोषाख परिधान केलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी शुक्रवारी मॉस्कोजवळील कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात किमान 40 लोक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाल्याचं समजतंय.. मुंबईवरील 26/11 हल्ल्याप्रमाणेच हा देखील दहशतवादी हल्ला असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?


यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. द असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियन राजधानीच्या पश्चिमेला असलेल्या क्रोकस सिटी हॉलमध्ये बंदुकधारींनी गोळीबार केला. नंतर स्फोटाचे आवाजही ऐकू आले आणि कॉन्सर्ट हॉल आगीत जळून खाक झाल्याचं पाहायला मिळालं. हल्लेखोर अद्याप काॅन्सर्ट हॉलमध्येच आहेत. एपीच्या वृत्तानुसार, रशियाची सर्वोच्च तपास संस्था मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबार आणि स्फोटाच्या घटनेची दहशतवादी हल्ला म्हणून चौकशी करत आहे.

गोळीबार सुरू झाल्यानंतर एक तासानंतर, रोसग्वार्डिया विशेष दल क्रोकस सिटी हॉलमध्ये पोहोचले आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी इमारतीमध्ये दहशतवादविरोधी कारवाया करत आहेत. तसेच आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरही घटनास्थळी पाठवण्यात आले. कॉन्सर्ट हॉलमध्ये शेकडो लोक अडकल्याची भीती असल्याने घटनास्थळी 70 हून अधिक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. रशियन न्यूज रिपोर्ट्सनुसार, गोळीबारानंतर बंदूकधाऱ्यांनी कॉन्सर्ट हॉलमध्ये बॉम्ब फेकले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इमारतीतून धुराचे लोट उठताना दिसत होते. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी रशियन स्पेशल फोर्सने इमारतीत प्रवेश केला आहे आणि ते ऑपरेशन करत आहेत.
 

मॉस्कोचे गव्हर्नर वोरोब्योव म्हणाले की, ‘क्रोकस सिटी हॉलजवळ 70 हून अधिक रुग्णवाहिका तैनात आहेत, डॉक्टर सर्व जखमींना आवश्यक मदत करत आहेत. हॉलमधून मृतांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. या आठवड्यासाठी रशियन राजधानीत सर्व सामूहिक मेळावे रद्द करण्यात आले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या दूतावासाने रशियातील अशा हल्ल्यांबाबत एक ॲडव्हायझरी जारी केली होती.’

यूएस दूतावासाने म्हटले होते की 'अतिरेकी' मॉस्कोमधील संगीत मैफिलीसारख्या मोठ्या संमेलनांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहेत. ॲडव्हायझरीमध्ये अमेरिकन नागरिकांना अशा मोठ्या मेळाव्यात जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कॉन्सर्ट हॉलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा तिथे 'पिकनिक म्युझिक' या बँडचा कार्यक्रम सुरू होता. या संगीत मैफलीची सर्व तिकिटे विकली गेलेली. एका अंदाजानुसार, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा हॉलमध्ये तब्बल 6200 लोक उपस्थित होते. क्रोकस येथील हॉलची कमाल क्षमता 9,500 लोकांची आहे. रशियाच्या विमानतळांवर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी आधी सुरक्षा रक्षकांची हत्या केली आणि नंतर कॉन्सर्ट हॉलची एंट्री आणि एक्झिट बंद करून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. स्फोटानंतर कॉन्सर्ट हॉलच्या वरच्या मजल्यावर आग लागली आणि छताचा काही भागही कोसळला.

    follow whatsapp