Crime News : झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील पिंडाराजोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे 9 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या 18 वर्षीय पुष्पा कुमारीच्या हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा झाला आहे. लग्नासाठी सतत दबाव टाकत असल्याने त्रस्त झालेल्या प्रियकरानेच पुष्पाची निर्जन जंगलात चाकूने भोसकून हत्या केली. पिंडाराजोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जंगलातून पोलिसांनी तरुणीचा सांगाडा जप्त केला आहे. मुख्य आरोपी आणि प्रियकर दिनेश कुमार महतो याने दिलेल्या माहितीच्या आधारे हा सांगाडा हस्तगत करण्यात आला.
ADVERTISEMENT
तीन वर्षांपासून प्रेमसंबंध
बोकारोचे पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, मृत पुष्पा कुमारी आणि आरोपी दिनेश महतो यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की, पुष्पा लग्नासाठी सतत दबाव टाकत असल्याने तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता आणि याच कारणामुळे त्याने तिच्या हत्येचा कट रचला.
हे ही वाचा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
कॉलेजच्या पाठीमागे नेऊन..
एसपी हरविंदर सिंह यांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पुष्पा कुमारी चास कॉलेजमध्ये पदवी प्रवेशासाठी आली होती. पूर्व नियोजित योजनेनुसार दिनेश महतो देखील तिथे पोहोचला आणि बोलण्याच्या बहाण्याने तिला कॉलेजच्या पाठीमागे सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन जंगल परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने चाकूने वार करून तिची हत्या केली आणि मृतदेह झुडपात लपवून तो पसार झाला. परतताना त्याने रक्ताने माखलेला चाकू वाटेतच फेकून दिला होता.
हे ही वाचा : अमरावती : '18-19 वर्षांच्या मुली रात्री उशीरापर्यंत थांबायच्या..,' 'त्या' बिल्डिंगमधील रहिवाशांचा खळबळजनक खुलासा
पाच पोलिसांचं निलंबन
तपासादरम्यान आरोपीने दाखवलेल्या जागी एसआयटी (SIT) पथकाला मृत तरुणीचे कपडे, केसांचे अवशेष, हाडांचे तुकडे आणि हत्येसाठी वापरलेला चाकू सापडला आहे. प्रकरणात हलगर्जीपणा आणि संशयास्पद भूमिका समोर आल्याने पोलीस अधीक्षकांनी पिंडाराजोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक रंजन यांच्यासह एकूण पाच पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असल्याचेही एसपींनी सांगितले.
ADVERTISEMENT











