‘उद्धव अन् आदित्य ठाकरेंकडून 10 हजार कोटी वसूल करा’ : मेट्रो प्रकरणावरून भाजपची मागणी

मुंबई तक

30 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:36 AM)

मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या बालिश हट्टामुळेच मेट्रो कारशेडचं काम रखडलं. त्यामुळेच मुंबईकरांवर १० हजार कोटींचा वाढीव बोजा पडला. हा मुंबईद्रोह आहे, असा आरोप राज्य भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केला. तसंच मेट्रोचे काम रखडवल्याबद्दल उद्धव आणि आदित्य या ठाकरे यांच्याकडून दहा हजार कोटी वसूल करा, अशीही मागणी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या बालिश हट्टामुळेच मेट्रो कारशेडचं काम रखडलं. त्यामुळेच मुंबईकरांवर १० हजार कोटींचा वाढीव बोजा पडला. हा मुंबईद्रोह आहे, असा आरोप राज्य भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केला. तसंच मेट्रोचे काम रखडवल्याबद्दल उद्धव आणि आदित्य या ठाकरे यांच्याकडून दहा हजार कोटी वसूल करा, अशीही मागणी त्यांनी केली. ते भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेतमध्ये बोलत होते.

हे वाचलं का?

यावेळी बोलताना उपाध्ये यांनी मेट्रो प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा कोणताही अभ्यास नसताना आणि मेट्रो कारशेड आरेमध्येच उभारणं योग्य असल्याचा अहवाल जाणीवपूर्वक दाबून ठेवल्याचाही आरोप ठाकरे पितापुत्रांवर केला. कारशेडच्या कामास स्थगिती देत मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचाच कट होता का? असा सवालही त्यांनी केला.

मेट्रो कारशेड आरेमध्येच उभारावा, असा स्पष्ट अहवाल मनोज सौनिक समितीनं २०२० मध्येच ठाकरे सरकारला दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयानेही आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास हिरवा कंदिल दाखविल्यानं ठाकरेंच्या हट्टाचे पितळ उघडं पडल्याचं उपाध्ये म्हणाले.

राज्याबद्दल उद्योगक्षेत्रात संशयाचे वातावरण तयार करून आता महाराष्ट्र द्रोह

मुंबईद्रोह झाल्यानंतर आता राज्याबद्दल उद्योगक्षेत्रात संशयाचे वातावरण तयार करून महाराष्ट्र द्रोह असल्याचा आरोप यावेळी उपाध्ये यांनी केला. ते म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी वस्तुस्थिती याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. केवळ घरातून सत्ता राबविण्याच्या उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळेच महाराष्ट्रातून अनेक प्रकल्पांनी काढता पाय घेतल्याचं वारंवार स्पष्ट होऊनही ही जबाबदारी ढकलून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न केविलवाणा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी दाखवलेली कागदपत्रे वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून जाऊ नये यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं केलेल्या प्रयत्नांची साक्ष देणारी आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी उद्धव ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांचा पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांनी एखादा कागद तरी दाखवावा, असं आव्हानही उपाध्ये यांनी दिलं.

राज्यात गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण नाही असा गैरसमज उद्योगविश्वात पसरविण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट असून त्यासाठीच पुन्हापुन्हा बिनबुडाच्या कंड्या पिकविल्या जात आहेत. सिनार्मस सारखे नवे प्रकल्प येत आहेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, ७५ हजार पदे भरण्याची मोहीम शिंदे फडणवीस सरकारने हाती घेतली आहे, असंही उपाध्येंनी यावेळी सांगितलं.

    follow whatsapp