एकनाथ शिंदेंचं नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल : गडचिरोलीत जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

मुंबई तक

• 09:39 AM • 24 Oct 2022

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षीची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत साजरी केली. यंदा पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्मीरमधल्या कारगील द्रास येथे भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. नरेंद्र मोदी यांच्या याच पावलावर पाऊल टाकतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यंदाची दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या (मंगळवारी) सकाळी […]

Mumbaitak
follow google news

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षीची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत साजरी केली. यंदा पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्मीरमधल्या कारगील द्रास येथे भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. नरेंद्र मोदी यांच्या याच पावलावर पाऊल टाकतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यंदाची दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या (मंगळवारी) सकाळी गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तसंच संध्याकाळी त्यांच्या शासकीय नंदनवन बंगल्यावरही ते शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री शिंदे लवकरच अतिवृष्टी भागाच्या पाहणी दौऱ्यावरही जाणार आहेत.

एकनाथ शिंदे आणि गडचिरोलीचं नातं :

एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. ही जबाबदारी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहे. मात्र शिंदे यांनी गडचिरोलीतील आपला संपर्क कायम ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अतिवृष्टी भागाच्या पाहणीसाठीही गडचिरोलीचा दौरा केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगीलमध्ये :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा जम्मू काश्मीरमधल्या कारगील द्रास येथे भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्यासाठी युद्ध हा पहिला पर्याय कधीच नाही. तसे आपल्यावर संस्कार आहेत. युद्ध हा आपल्यासाठी शेवटचा पर्याय आहे. लंकेतलं युद्ध असो किंवा कुरूक्षेत्रातील युद्ध असो ते शेवटपर्यंत टाळण्याचाच प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आपला देश विश्वशांतीचे समर्थक आहोत. शांतता सामर्थ्याविना शक्य नसते. आपल्या सेनेकडे सामर्थ्य आहे. रणनीती आहे. कुणीही आपल्याकडे नजर वाकडी करून पाहात असेल तर आपले सैनिक जशास तसं उत्तर देण्यास समर्थ आहेत

भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर आकाशही झुकतं. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचं प्रतीक आहे. शिखरावर बसलेला शत्रूही भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर छोटा होतो. भारताचे सैनिक सीमेचे रक्षक असून देशाचे आधार स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातले लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते. अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासात असतो तेव्हाच देश सुरक्षित असतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp