पुण्यात कॉलेज सुरू; उच्च शिक्षण मंत्री म्हणतात, ‘अजून आदेशच काढला नाही’

मुंबई तक

• 07:51 AM • 12 Oct 2021

कोरोनाच्या दोन लाटांनंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. राज्य सरकारकडून एका एका गोष्टीवरील निर्बंध शिथिल केले जात असून, तब्बल दोन वर्षांपासून बंद असलेली विद्यापीठं आणि महाविद्यालयेही सुरू करण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली. राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आली असून, सरकारने निर्बंध सैल […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दोन लाटांनंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. राज्य सरकारकडून एका एका गोष्टीवरील निर्बंध शिथिल केले जात असून, तब्बल दोन वर्षांपासून बंद असलेली विद्यापीठं आणि महाविद्यालयेही सुरू करण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली.

हे वाचलं का?

राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आली असून, सरकारने निर्बंध सैल केले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील शाळाही सुरू करण्यात आल्या असून, पुण्यात शाळापाठोपाठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. पुण्यात काही महाविद्यालये आजपासून (12 ऑक्टोबर) सुरू झाली आहेत. मात्र, राज्यात महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णयच झालेला नसल्याची माहिती सामंत यांनी दिली.

पुण्यात काही महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयेही सुरू करण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली. खुलासा करत पुण्यासह राज्यात कुठेही महाविद्यालय सुरू करण्यातसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन आदेश काढलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे.

‘पुण्यात काही ठिकाणी स्वायत्त महाविद्यालये सुरू झाल्याची बातमी चालवली जात आहे. यासंदर्भात मी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरुंशी बोललो आहे. संचालकांशी बोललो आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कुठेही महाविद्यालये सुरू करण्याबाबत आदेश काढलेला नाही’, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महाविद्यालये कधीपासून सुरू करायची, याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल. तारीख जाहीर करणार आहोत. नियमावलीही आम्ही जाहीर करणार आहोत. महाविद्यालये कशी सुरू होतील, कोणत्या भागातील सुरू होतील, याची माहिती उद्या किंवा परवा दिली जाईल’, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

    follow whatsapp