महाराष्ट्रात राहूनही घर विकण्याची जाहिरात देताना मराठी माणसाला घर विक्री करण्यास नकार देणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मीरा रोड परिसरातील नयानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात कार्यरत असलेल्या गोवर्धन देशमुख यांना फेसबुकवर रिंकू संगोई देढीया यांची एक जाहिरात वाचनास आली.
या जाहिरातीत त्यांना मीरा रोडच्या शांतीनगरमधील फ्लॅट विकायचा आहे, असं नमूद केलं होतं. परंतु देढीया यांनी आपल्या पोस्टमध्ये हा फ्लॅट फक्त गुजराती, मारवाडी आणि जैन समाजातील लोकांनाच विकणार असल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे.
यानंतर देशमुख यांनी फेसबुकवर दिलेल्या जाहिरातीमध्ये नमूद फोन नंबरवर संपर्क साधला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने स्वतःचं नाव राहुल देढीया असं सांगितलं. देशमुख यांनी मला तुमचा फ्लॅट विकत घ्यायचा आहे, असं सांगितल्यावर देढीया यांनी आमच्या सोसायटीत मराठी, ख्रिश्चन, मुस्लिम लोकांना फ्लॅट विकत नाहीत, असा सोसायटीचा नियम असल्यामुळे तुम्हाला फ्लॅट विकता येणार नाही, असं उत्तर त्यावर दिलं.
या प्रकरणी देशमुख यांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांत तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. यानंतर रविवारी नयानगर पोलिसांनी रिंकू देढीया आणि राहुल देढीया यांच्यावर IPC 153 A कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.
मराठी माणसाला फ्लॅट नाकारुन समाजात वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
