नागपुरात भर पावसात महागाईविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ नागपुरात गुरुवारी काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून या मुसळधार पावसामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांनी नागपुरातील संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत सायकल रॅली काढली. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:41 AM • 08 Jul 2021

follow google news

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ नागपुरात गुरुवारी काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून या मुसळधार पावसामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांनी नागपुरातील संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत सायकल रॅली काढली. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मागील सात वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले असल्याचा आरोप या वेळी काँग्रेसने केलेला आहे.

हे वाचलं का?

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढवले असल्याने आम्ही पावसात ही रॅली काढली आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कायमच पुढाकार घेत असतं यापुढेही घेणार आहे. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवले असल्याने सामान्य माणसांचं जगणं कठीण झालं आहे. सामान्य माणसांनी काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे महागाई वाढली आहे अशात जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही ही रॅली काढली होती असं नाना पटोले यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे केंद्र सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. उद्या म्हणजेच शुक्रवारीही महिला काँग्रेसचा मोर्चा नागपूरमध्ये निघणार आहे. इंधन दरवाढीमुळे आणि गॅसच्या दरवाढीमुळे सामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. मोदी सरकार जोपर्यंत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp