आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी परीक्षा अन् कोट्यवधींचा भ्रष्टाचार; पोलिसांना आतापर्यंत काय सापडलं?

राज्यात विविध परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. आरोग्य विभागातील विविध पदांसाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याबरोबर म्हाडा परीक्षेचा पेपरही फोडण्याचाही कट होता. त्याचबरोबर या तपासात टीईटी परीक्षेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचंही समोर आलेलं असून, पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. तिन्ही प्रकरणाच्या तपासाबद्दल पुणे पोलिसांनी आज माहिती दिली. पोलीस काय म्हणाले? 31 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:58 AM • 28 Dec 2021

follow google news

राज्यात विविध परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. आरोग्य विभागातील विविध पदांसाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याबरोबर म्हाडा परीक्षेचा पेपरही फोडण्याचाही कट होता. त्याचबरोबर या तपासात टीईटी परीक्षेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचंही समोर आलेलं असून, पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. तिन्ही प्रकरणाच्या तपासाबद्दल पुणे पोलिसांनी आज माहिती दिली.

हे वाचलं का?

पोलीस काय म्हणाले?

31 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य विभागाच्या नोकर भरतीतील गट ‘ड’ प्रवर्गातील लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच फोडण्यात आल्याबाबत पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची प्राथमिक चौकशी केली असता परीक्षेपुर्वीच प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचे ठोस पुरावे मिळाले. पोलिसांनी ही माहिती आरोग्य विभागाच्या सचिवांना कळवली होती. त्यानुसार मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगांवकर यांच्या तक्रारीवरून 26 नोव्हेंबर 2021 रोजी (गु.र क्रमांक ५३ / २०२१ भा.दं.वि कलम ४०६,४०९, ४२० १२०(ब), ३४ सह महाराष्ट्र विदयापिठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनीयम कलम ३.५.६८ कलमांखाली) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोग्य विभाग भरतीची प्रश्नपत्रिका ‘न्यासा’च्या अधिकाऱ्यांनीच फोडली; छपाईवेळीच केला प्रताप

या प्रकरणात पोलिसांनी एकूण 18 आरोपी अटक केले आहे. यामध्ये आरोग्य विभागातील सह संचालक महेश बोटले, लातूर आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, अंबाजोगाई येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप जोगदंड यांच्यासह आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आणि पेपर फोडून पुरविणारे एजंट व काही परिक्षार्थीचा समावेश आहे. 31 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी दुपारी दोन ते चार या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत 100 पैकी 92 प्रश्न परीक्षेपुर्वीच फुटून समाज माध्यमांवरून पुरवण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासून समोर आलं आहे.

याबाबत अटक आरोपींकडून पोलिसांना तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. काही आरोपींनी इतर परीक्षेत देखील पेपर फोडल्याचे व गैरप्रकार केल्याचंही तपासातून समोर आलं आहे. तसेच आणखी आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

10 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये 12 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात येणाऱ्या म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्यात येणार असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ संशयितांचा शोध घेतला त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी पेपरफुटी प्रकरणासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी ही माहिती राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांना दिली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.

TET Exam scam : पात्र उमेदवारांच्या यादीत घुसवली 500 नावे; असा करण्यात आला घोटाळा…

दरम्यान, 12 डिसेंबर 2021 रोजी म्हाडाचे पुणे मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा (क्रमांक ५५ / २०२१ भा.दं.वि कलम ४०६,४०९,४२०,१२० (ब).३४ सह महाराष्ट्र विदयापिठ, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनीयम कलम ३.५.६.८) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात परीक्षा घेण्याचं काम देण्यात आलेल्या जी. ए. सॉफटवेअर कंपनीचा अधिकारी डॉ. प्रितीश देशमुख, (रा. वर्धा) यांच्यासह संतोष हरकळ (रा. औरंगाबाद) व अंकुश हरकळ (रा. बुलढाणा) या दोन एजंटांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

म्हाडा पेपर फुटीचा तपास सुरू असताना अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जी.ए. सॉफटवेअर या कंपनीने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2019-20 व 2018 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांच्या निकालात फेरफार करण्यात आल्याचं समोर आलं. याबद्दल पोलिसांनी शिक्षण विभागाच्या आयुक्तांना माहिती दिली. त्यावरून 16 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2019-20 मधील टीईटी गैरप्रकाराबाबत (गु.र. क्रमांक ५६/२०२१ भा.दं.वि कलम ४०६,४०९, ४२०४६५,४६७,४६८३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) सह महाराष्ट्र विदयापिठ, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनीयम कलम ७.८ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नीचा डाव फसला! लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं

या प्रकरणात परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. आरोपी तुकाराम सुपे याच्याकडून एकूण 3 कोटी, 23 लाख 36 हजार 840 रूपये रोख रक्कम व 150.5 तोळयाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 67 लाख 78 हजार 800 रुपये) आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा ताबा घेवून इतर अनेक आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

    follow whatsapp