Queen Elizabeth II Death : भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; केंद्राचा निर्णय

मुंबई तक

• 09:39 AM • 09 Sep 2022

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी (८ सप्टेंबर) निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रॉयल फॅमिलीने दिलेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय मागील काही काळापासून episodic mobility आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांना उभं राहण्यात, चालण्यात अडचणी येत होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचीही लागण झाली होती. अशातच गुरूवारी सकाळी […]

Mumbaitak
follow google news

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी (८ सप्टेंबर) निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रॉयल फॅमिलीने दिलेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय मागील काही काळापासून episodic mobility आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांना उभं राहण्यात, चालण्यात अडचणी येत होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचीही लागण झाली होती. अशातच गुरूवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. तेव्हापासून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. (Britain Queen Elizabeth II died)

हे वाचलं का?

दरम्यान, एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटन शोकसागरात बुडाला आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबतचे दोन फोटोही त्यांनी ट्विट केले. यासोबत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारताच्या गृहमंत्रालयाकडून एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ट्विट करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर रोजी भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती देणारे ट्विट गृह मंत्रालयाने केले आहे.

राणी एलिझाबेथ यांची ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकीर्द थोडी-थोडकी नाही तर तब्बल ७० वर्षांची ठरली. या कालावधीत त्यांनी ब्रिटनचे १५ पंतप्रधान पाहिले. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स हे ब्रिटनचे किंग झाले आहेत. एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या नाही तर १४ आणखी देशांच्या महाराणी होत्या. हेच पद आता किंग चार्ल्स यांच्याकडे आलं आहे.

वेस्टमिन्सिटर अॅबे या ठिकाणी होणार अंत्यसंस्कार

महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव हे आधी रॉयल ट्रेनने एडिनबर्ग या ठिकाणी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचं कॅफेन रॉयल माइल ते सेंट जाइल्स कॅथेड्रल पर्यंत नेण्यात येईल. या ठिकाणी शाही परिवारातले सदस्य आणि जनता महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवाला आदरांजली वाहणार आहे.

त्यानंतर पार्थिव पुन्हा एकदा रॉयल ट्रेनमध्ये किंवा हवाई मार्गाने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस या ठिकाणी आणलं जाईल. पंतप्रधान आणि कॅबिनेटचे सदस्य पार्थिव ताब्यात घेतील. बकिंगहॅम पॅलेसमध्ये महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर ८ दिवसांचा दुखवटा असेल. त्यानंतर वेस्टमिंन्स्टर एबे या ठिकाणी महाराणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात य़ेतील.

    follow whatsapp