आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... 'उद्या 12 वाजता...' संजय राऊतांनी दिली अवघ्या महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज!

शिवसेना UBT आणि मनसे यांच्या युतीची घोषणा घोषणा उद्या दुपारी 12 वाजता करण्यात येऊ शकते. त्यासंबंधीचं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती.

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:11 PM • 23 Dec 2025

follow google news

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज X (पूर्वीचे ट्विटर) वर एक जुना फोटो पोस्ट केला, ज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसत आहेत. या फोटोसोबत संजय राऊतांनी केवळ "उद्या 12 वाजता" असा मेसेज आहे. हा फोटो आणि त्यावरील मेसेजने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना UBT यांच्यातील संभाव्य युतीच घोषणा केली जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही युती मुंबई महापालिका (BMC) आणि इतर महापालिका निवडणुकांसाठी असून, उद्या (24 डिसेंबर) दुपारी 12 वाजता अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

राजकीय पार्श्वभूमी: शिवसेनेचे विभाजन आणि निवडणुका

महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली, ज्याने मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी अस्मितेचे प्रतिनिधित्व केले. 2012 मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख झाले, तर राज ठाकरे यांनी 2006 मध्येच मनसेची स्थापना केली होती.

2022 मध्ये शिवसेना फुटली: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना फुटली. शिंदे गटाने भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं.  तर उद्धव ठाकरेंच्या पक्षावा 'शिवसेना UBT' आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा बराचसा फटका हा उद्धव ठाकरेंना बसला. अशातच आता मुंबई महापालिका ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे त्यांनी आता मनसेशी युती करण्याची तयारी केली आहे.

2024 विधानसभा निवडणुका: महायुतीने (भाजप, शिंदे सेना, अजित पवार एनसीपी) 230+ जागा जिंकल्या, तर शिवसेना यूबीटीला केवळ 20 जागा मिळाल्या. मनसेला एकही जागा मिळाली नाही. या पराभवानंतर दोन्ही ठाकरे बंधूंना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. 

आता, जानेवारी 2026 मध्ये BMC सह 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी ठाकरे बंधूंची युती ही एक रणनीतिक चाल आहे. BMC ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, तिचे बजेट 50,000 कोटींपेक्षा जास्त आहे. महायुतीने येथे वर्चस्व गाजवले तर ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो.

युतीचे तपशील: जागावाटप आणि उद्देश

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना UBT आणि मनसे युतीचे जागावाटप अंतिम झाले आहे. BMC च्या 227 जागांसाठी शिवसेना यूबीटी आणि मनसे एकत्र लढतील. राज ठाकरेंना मुंबईत 50-60 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर महापालिकांमध्येही समन्वय असेल. दुसरीकडे काँग्रेसने मात्र मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-मनसेची युती ठाकरे बंधूंना कितीपत यश मिळवून देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे बंधूंसमोरील आव्हानं

  • महायुतीला आव्हान देणे आणि मुंबईतील मराठी मतदारांना एकत्र करणं.
  • आपआपल्या पक्षांना पुनरुज्जीवन देणे, ज्यामुळे ते विधानसभेतील पराभवानंतर मजबूत होऊ शकतात.
  • राज ठाकरेंना मनसेला नवसंजीवनी देण्याची संधी.

राज ठाकरेंनी नुकतीच पक्ष नेत्यांची बैठक बोलावली होती,  ज्यात युतीवर चर्चा झाली. दुसरीकडे सोशल मीडियावर #ठाकरे आणि #ThackerayBrothers हे ट्रेंड होत आहेत. अनेकांनी याला 'महाराष्ट्र धर्म वाढवावा' असे म्हटले आहे, तर काहींनी युतीसाठी उशीर झाल्याची टीका केली आहे.
 

    follow whatsapp